श्रीलंका क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडने श्रीलंकेचा ५ विकेट्सने पराभव केला. इंग्लंडचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू जो रूटने दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले.
रूट १२८ चेंडूत ६२ धावा करून नाबाद राहिला. यासह जो रूटने राहुल द्रविडचा खास विक्रम मोडला आहे. तो आता कसोटीत सर्वाधिक अर्धशतके करणारा तिसरा फलंदाज बनला आहे. एवढेच नाही तर जो रूटने ॲलन बॉर्डरलाही मागे टाकले आहे.
राहुल द्रविडने आपल्या कारकिर्दीत १६४ कसोटी सामने खेळले. या काळात त्याने २८६ डावांमध्ये ५२.३१ च्या सरासरीने आणि ४२.५१ च्या स्ट्राईक रेटने १३२८८ धावा केल्या. त्याने कसोटीत ६३ अर्धशतके झळकावली होती. त्याच्याशिवाय ॲलन बॉर्डरनेही कसोटीत ६३ अर्धशतके झळकावली. आता जो रूटने दोन्ही दिग्गजांना मागे सोडले आहे.
रूटने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत १४४ कसोटी खेळल्या आहेत. या कालावधीत त्याने २६३ डावांमध्ये ५०.३३ च्या सरासरीने आणि ५६.७० च्या स्ट्राईक रेटने १२१३१ धावा केल्या आहेत. इंग्लिश अष्टपैलू खेळाडूने कसोटीत ६४ अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय त्याने क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये ३२ शतके झळकावली आहेत.
सचिन तेंडुलकर : ६८ अर्धशतके
शिव नारायण चंद्रपॉल : ६६ अर्धशतके
जो रूट : ६४ अर्धशतके
राहुल द्रविड : ६३ अर्धशतके
ॲलन बॉर्डर : ६३ अर्धशतके
सचिन तेंडुलकरचा विक्रम निशाण्यावर
जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने नवनवीन कामगिरी करत आहे. तो लवकरच सचिन तेंडुलकरला मागे टाकू शकतो. यासाठी त्याला कसोटीत आणखी ५ अर्धशतके करावी लागतील. जो रूट सध्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा ७वा खेळाडू आहे. तो लवकरच कुमार संगकारा आणि ॲलिस्टर कुक यांना मागे टाकू शकतो.
सचिन तेंडुलकर: १५९२१ धावा
रिकी पाँटिंग : १३३७८ धावा
जॅक कॅलिस: १३२८९ धावा
राहुल द्रविड: १३२८८ धावा
ॲलिस्टर कुक : १२४७२ धावा
कुमार संगकारा: १२४०० धावा
जो रूट: १२१३१ धावा