विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विदर्भाने महाराष्ट्राचा ६९ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात विदर्भ संघाने पूर्ण वर्चस्व राखले. प्रथम फलंदाजी करताना संघाने ३८० धावांची मोठी धावसंख्या उभारली.
यानंतर गोलंदाजीत आणि क्षेत्ररक्षणात दमदार कामगिरी करून महाराष्ट्राला पराभूत केले. यादरम्यान विदर्भाचा यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्मा याचा एक झेल चांगलाच चर्चेत आला आहे. याचा व्हिडीओही प्रचंड व्हायरल होत आहे.
जितेशने हा झेल डावाच्या तिसऱ्या षटकात दर्शन नळकांडेच्या चेंडूवर घेतला, महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने मोठा फटका मारण्याच्या प्रयत्न केला, पण चेंडू बॅटवर व्यवस्थित आला नाही. चेंडू बॅटच्या वरच्या काठाला लागला आणि लेग साइडच्या दिशेने हवेत उडाला. त्यानंतर जितेशने धावत जात डाइव्ह मारली आणि झेल पकडला.
जितेशने या सामन्यात विदर्भासाठी केवळ यष्टिरक्षणातच नव्हे तर फलंदाजीतही आपले कौशल्य दाखवले. जितेशने संघासाठी ३३ चेंडूत १५४.५५ च्या स्ट्राईक रेटने ५१ धावा दिल्या. या खेळीत जितेशने ३ षटकार आणि तितकेच चौकार मारले.
जितेशच्या आधी ध्रुव शौर्य आणि यश राठोड यांनी विदर्भासाठी उत्कृष्ट शतकी खेळी खेळली. याशिवाय कर्णधार करुण नायरनेही ८८ धावा केल्या, त्यामुळे विदर्भाने निर्धारित ५० षटकांत ३८० धावा केल्या.
विदर्भाविरुद्धच्या या सामन्यात ३८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना महाराष्ट्राची सुरुवात खराब झाली. अवघ्या ८ धावांच्या स्कोअरवर टीमने पहिला विकेट गमावला. यानंतर विदर्भाच्या गोलंदाजांनी ठराविक अंतराने विकेट्स घेत राहिल्याने दबाव चांगलाच वाढला. अशा स्थितीत महाराष्ट्राला ५० षटकांत ७ गडी बाद ३११ धावाच करता आल्या.
संबंधित बातम्या