जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होणार असल्याचे बोलले जात आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याचा आज (२७ ऑगस्ट) शेवटचा दिवस होता. जय शाह यांनी नामांकन केले आणि त्यांना इतर आयसीसी सदस्यांचा पाठिंबा मिळाला. अशा प्रकारे जय शहा यांची आयसीसी अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
आयसीसीचे अध्यक्ष बनणारे जय शाह हे चौथे भारतीय आहेत. याआधी जगमोहन दालमिया, शरद पवार आणि शशांक मनोहर हे आयसीसीचे अध्यक्ष राहिले आहेत.
वास्तविक, आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबर रोजी संपत आहे. मात्र त्यांनी या पदावर कायम राहण्यास नकार दिला. यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह आयसीसीचे नवे अध्यक्ष झाले. जय शाह ICC चेअरमन बनण्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी लवकरच ही घोषणा होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जय शाह ICC चेअरमन बनण्याची अधिकृत घोषणा काही दिवसानंतर केली जाईल.
दरम्यान, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. जय शाह हे गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र आहेत. २०१९ मध्ये जय शहा यांना बीसीसीआयच्या सचिवपदाची जबाबदारी मिळाली आणि तेव्हापासून त्यांनी आपली जबाबदारी चोेख पार पाडली आहे.
बीसीसीआयचे सचिव असण्यासोबतच ते आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्षही आहेत. २०२१ मध्ये ते आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष झाले. दरम्यान येथे आपण जय शाह यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत.
जय शाह यांचा जन्म २२ सप्टेंबर १९८८ रोजी झाला आणि ते एक भारतीय उद्योगपती आणि क्रिकेट प्रशासक आहेत.
२०१३ मध्ये जय शाह यांना गुजरात क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव बनवण्यात आले होते.
२०१९ मध्ये जय शाह यांना बीसीसीआयचे सचिव बनवण्यात आले.
जय शाह यांनी गुजरातमधून शिक्षण घेतले आहे. बारावीनंतर निरमा विद्यापीठातून बी.टेक.ची पदवी घेतली.
जय शाह यांची एकूण संपत्ती १२४ कोटी रुपये आहे. त्यांच्या व्यवसायातून त्यांना ही संपत्ती मिळाल्याचे सांगितले जाते.
जय शाह यांच्या पत्नीचे नाव ऋषिता पटेल आहे. दोघेही कॉलेजचे मित्र होते. ऋषिताच्या वडिलांचे नाव गुणवंतभाई पटेल असून ते व्यापारी आहेत. जय शाह यांनी १० फेब्रुवारी २०१५ रोजी ऋषिताशी लग्न केले आणि दोघांना दोन मुली आहेत.