Jasprit Bumrah Wife Sanjana Ganesan Insta Story : मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८४ धावांनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर भारत आता बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ मध्ये १-२ ने पिछाडीवर आहे.
मात्र, या निराशाजनक सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याची कामगिरी अभिमानास्पद होती.
जसप्रीत बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये २०० बळी पूर्ण मोठा विक्रम रचला. दुसऱ्या डावात घेतलेल्या ५ विकेट्ससह त्याने सामन्यात एकूण ९ विकेट घेतल्या. या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या शोएब अख्तरला मागे टाकले. बुमराहने आता कसोटीत १३ वेळा एका डावात ५ बळी घेण्याचा विक्रम केला आहे. शोएबने १२ वेळा कसोटीत एका डावात ५ विकेट घेतल्या होत्या.
सोबतच जसप्रीत बुमराह २० पेक्षा कमी सरासरीने २०० बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. आपल्या ४४व्या कसोटीत ही कामगिरी करणाऱ्या बुमराहने आतापर्यंत २०३ बळी घेतले असून त्याची सरासरी १९.४२ इतकी आहे.
या आकड्यांसह त्याने वेस्ट इंडिजच्या माल्कम मार्शल, जोएल गार्नर आणि कर्टली ॲम्ब्रोस सारख्या महान गोलंदाजांच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे.
जसप्रीत बुमराहच्या कामगिरीचा आनंद त्याचा मुलगा अंगद याने अनोख्या पद्धतीने साजरा केला. त्याची पत्नी आणि स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशन हिने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली, ज्यामध्ये अंगद हातात मॅच बॉल धरलेला दिसत होता.
या पोस्टवर संजनाने लिहिले की, "आज आणि प्रत्येक दिवशी मला तुझा अभिमान आहे, डॅडा." हा फोटो चाहत्यांमध्ये व्हायरल होत असून लोकांची मने जिंकत आहे.
जसप्रीत बुमराहच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे त्याला आयसीसीच्या 'टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर' या किताबासाठी नामांकन मिळाले आहे. या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी त्याची स्पर्धा इंग्लंडच्या जो रूट, हॅरी ब्रूक आणि श्रीलंकेच्या कामिंदू मेंडिस यांच्याशी होणार आहे.