भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या बेड रेस्टच्या बातम्या आल्या होत्या. वास्तविक, जसप्रीत बुमराह याला आराम करण्यास सांगण्यात आल्याचे म्हटले होते. त्याला झोपायला सांगितले आहे. पण ही बातमी चुकीची असल्याचे म्हणत बुमराहने एक मजेदार ट्विट केले आहे.
या बातमीबद्दल जसप्रीत बुमराहने X वर म्हटले, की ‘मला माहित आहे की फेक न्यूज पसरवणे सोपे आहे. पण या बातमीमुळे मला खूप हसू आले. तुमची सूत्रं विश्वसनीय नाहीत.’
वास्तविक, बुमराहला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापत झाली होती. सिडनी येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि अंतिम कसोटीच्या पहिल्या डावात बुमराहचे स्कॅनिंग करण्यात आले. त्यानंतर त्याने सामन्यात गोलंदाजी केली नाही. बुमराहला पाठीला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याचे चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणेही साशंक आहे.
ऑस्ट्रेलियात जसप्रीत बुमराहची कामगिरी जबरदस्त होती. त्याच्यासमोर ऑस्ट्रेलियन फलंदाज दबावात खेळत होते. जस्सीची ही आतापर्यंतची सर्वोत्तम मालिका होती. त्याने पाच कसोटीत ३२ बळी घेतले. तो या मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. त्याला प्लेअर ऑफ द सिरीज देखील निवडण्यात आले.
जसप्रीत बुमराहला डिसेंबर २०२४ च्या महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले. त्याने ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स आणि दक्षिण आफ्रिकेच्या डॅन पॅटरसन यांना मागे टाकून हा पुरस्कार जिंकला.
३१ वर्षीय बुमराहने भारतासाठी आतापर्यंत ४५ कसोटी, ८९ एकदिवसीय आणि ७० टी-20 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत २०५, एकदिवसीय सामन्यात १४९ आणि T20 मध्ये ८९ बळी आहेत. जस्सी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पूर्णपणे तंदुरुस्त असेल याबाबत स्पष्टपणे काहीही माहिती नाही. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बुमराह खेळला नाही तर भारताला हा मोठा धक्का असेल.
संबंधित बातम्या