Jasprit Bumrah Most Wickets Series in Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची पाचवी आणि शेवटची कसोटी SCG येथे खेळली जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराह याने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
जसप्रीत बुमराह हा परदेशात भारतासाठी एकाच कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी (४ जानेवारी) बुमराहने मार्नस लाबुशेन याला बाद करून हा मोठा विक्रम केला. या मालिकेत त्याने आतापर्यंत ३२ विकेट घेतल्या आहेत.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे अनुभवी बिशनसिंग बेदी आहे, त्यांनी १९७७-७८ मध्ये ऑस्ट्रेलियात ३१ बळी घेतले होते. तिसऱ्या क्रमांकावर भगवत चंद्रशेखर आहे. त्यांनी याच मालिकेत २८ विकेट्स घेतल्या आहेत. तर सुभाष गुप्ते यांनी १९५२-५३ मध्ये वेस्ट इंडिजमध्ये २७ विकेट घेतल्या होत्या.
सिडनी कसोटीत भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय संघ केवळ १८५ धावा करून ऑलआऊट झाला. टीम इंडियाकडून ऋषभ पंतने सर्वाधिक ४० धावा केल्या.
यानंतर एकाही खेळाडूला ३० धावांपर्यंत मजल मारता आली नाही. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलंडने सर्वाधिक ४ बळी घेतले. मिचेल स्टार्कने ३, पॅट कमिन्सने २ तर नॅथन लायनला १ विकेट मिळाली.
खेळाच्या पहिल्या दिवशी जसप्रीत बुमराहला दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर उस्मान ख्वाजाच्या रूपाने भारताची एकमेव विकेट मिळाली. यानंतर सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी खळबळ उडवून दिली. जस्सीने मार्नस लॅबुशेन येताच त्याला पुन्हा तंबूत पाठवले. त्यानंतर मोहम्मद सिराजने सॅम कॉन्स्टास आणि ट्रॅव्हिस हेडला एकाच षटकात बाद केले.
संबंधित बातम्या