Cricket News Marathi : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. दुखापतीमुळं तो बराच काळ संघाबाहेर होता, पण गेल्या वर्षभरापासून तो सातत्यानं भारताकडून खेळत आहे. दुखापतीनंतर पुन्हा परतलेला बुमराह गोलंदाजीच्या माध्यमातून अक्षरश: आग ओकतो आहे. त्याबाबतचे आकडे सगळं काही सांगून जातात.
स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे बुमराह सप्टेंबर २०२२ ते ऑगस्ट २०२३ पर्यंत क्रिकेटच्या मैदानापासून लांब होता. दुखापतीनंतर तो पुन्हा खेळू लागला आहे. कोणत्याही एका फॉरमॅटमध्येच नाही तर प्रत्येक फॉरमॅटमध्ये तो चांगली कामगिरी करत आहे. आयपीएलमध्येही त्याची आकडेवारी पूर्वीच्या तुलनेत बदलली आहे.
दुखापतीच्या आधी त्याची कसोटी क्रिकेटमधील सरासरी २१.९९ होती, ती आता १५.३९ झाली आहे. वनडे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी २४.३० वरून २०.२८ वर आली आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोलायचं झाल्यास दुखापतीआधी त्याची सरासरी २०.२२ होती, ती आता ८.५७ झाली आहे. आयपीएलमध्ये त्याची सरासरी २३.३० होती, पण आता त्याची सरासरी १६.८० इतकी आहे. एका विकेटसाठी किती धावा दिल्या यावरून गोलंदाजीची सरासरी काढली जाते.
बुमराहच्या इकॉनॉमी रेटमध्येही सुधारणा झाली आहे. कसोटीत इकॉनॉमी रेट थोडा वाढला असला तरी वनडे आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांव्यतिरिक्त आयपीएलमध्ये धावा देण्याच्या बाबतीत तो कंजूष झाला आहे. कसोटीमध्ये त्याचा इकॉनॉमी रेट २.६९ होता, तो आता २.९९ झाला आहे. तर वनडेमध्ये इकॉनॉमी रेट ४.६३ होता, तो आता ४.४० वर आला आहे. याशिवाय टी-२० क्रिकेटमध्ये तो ६.६२ वरून ४.३२ वर आला आहे. आयपीएलमध्ये तो ७.३९ च्या इकॉनॉमी रेटनं धावा देत होता, पण आता तो ६.४८ च्या इकॉनॉमी रेटनं धावा देत आहे. अशा तऱ्हेने केवळ विकेट घेण्याच्या बाबतीतच नव्हे, तर धावांच्या बाबतीतही तो खूपच प्रभावी ठरला आहे.
संबंधित बातम्या