Jasprit Bumrah vs Sam Konstas : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे शेवटचा कसोटी सामना खेळला जात आहे. सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवसाचा (३ जानेवारी) खेळ संपला आहे. टीम इंडिया पहिल्या दिवशी १८५ रन्सवर ऑलआऊट झाली होती. त्यानंतर टीम इंडियाला दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३ षटके टाकण्याची संधी मिळाली.
या ३ षटकांमध्येच चाहत्यांना जबरदस्त थरार पाहायला मिळाला. तसेच, या संपूर्ण कसोटी कशी होणार आहे, याचा ट्रेलरही पाहायला मिळाला. पहिल्या दिवशीच्या शेवटच्या षटकात जसप्रीत बुमराह आणि सॅम कॉन्स्टास यांच्यात राडा झाला.
टीम इंडियाने पहिल्या दिवशी ३ षटके टाकली. या तीन षटकांमध्ये टीम इंडियाला एक विकेटही मिळाली. विशेष म्हणजे, या विकेटआधी जसप्रीत बुमराह आणि सॅम कॉन्स्टास यांच्यात वाद झाला.
वास्तविक, बुमराहला जलद गतीने षटक संपवायचे होते. जेणेकरून टीम इंडियाला आणखी एक-दोन षटके टाकता येतील. पण स्ट्राइकवर असलेला उस्मान ख्वाजा फलंदाजीसाठी तयार व्हायला वेळ घेत होता. यावरून बुमराहने उस्मान ख्वाजाला फटकारले.
पण बुमराह ख्वाजाला बोलत असताना सॅम कॉन्स्टास मधात पडला आणि तो बुमराहाल काहीतरी बोलला. यानंतर बुमराहनेही त्याच्याकडे जात त्याला प्रत्युत्तरत दिले. हा सगळा प्रकार दिवसाचा शेवटचा चेंडू टाकण्याआधी घडला.
मग काय बुमरहाने शेवटचा चेंडू अप्रतिम टाकला. यावर उस्मान ख्वाजा स्लीपमध्ये केएल राहुल करवी झेलबाद झाला.
ख्वाजा बाद होताच बुमराहने कॉन्स्टासच्या अंगावर धाव घेत सेलिब्रेशन केले. यानंतर टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंनी कॉन्स्टासच्या समोर जल्लोष केला. हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर क्रिकेट चाहत्यांचा अंगावर शहारे आले असतील.
दरम्यान, सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने एक विकेट गमावून ९ धावा केल्या होत्या. उस्मान ख्वाजा २ धावा करून बाद झाला. तर सॅम कॉन्स्टास ७ धावा करून नाबाद आहे.
संबंधित बातम्या