Jasprit Bumrah Fitness Update : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याला क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते. दुखापतीमुळे बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये खेळू शकला नाही, आता एक नवीन अपडेट समोर आले आहे, की तो आयपीएल २०२५ च्या पहिल्या दोन आठवड्यात एकही सामना खेळू शकणार नाही.
एका मीडिया रिपोर्टनुसार, जसप्रीत बुमराह एप्रिल महिन्यात मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षण शिबिरात सामील होऊ शकतो. तर आयपीएल २२ मार्चपासून सुरू होणार आहे.
बीसीसीआयच्या एका सूत्राने टाईम्स ऑफ इंडियाच्या हवाल्याने म्हटले आहे की, "जसप्रीत बुमराहचे वैद्यकीय अहवाल चांगले आहेत. त्याने सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये गोलंदाजीचा सराव सुरू केला आहे. परंतु आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये त्याच्याकडून खेळण्याची फार कमी आशा आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात त्याचे पुनरागमन शक्य आहे.
अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्ससाठी पहिले ३-४ सामने खेळू शकणार नाही. बुमराह पूर्ण ताकदीनिशी गोलंदाजी करू शकत नसल्याचे सांगितले जात आहे. वैद्यकीय पथक हळूहळू त्याच्यावर कामाचा ताण वाढवणार असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.
जोपर्यंत बुमराह पूर्ण उत्साहाने आणि ताकदीने गोलंदाजी करू शकत नाही तोपर्यंत त्याला तंदुरुस्त घोषित केले जाणार नाही. लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादव देखील पूर्णपणे तंदुरुस्त नाही. एप्रिल महिन्यातील एलएसजीच्या प्रशिक्षण शिबिरातही तो सहभागी होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान जसप्रीत बुमराह याला पाठीचा त्रास होऊ लागला. सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करण्यासाठीही तो मैदानात आला नव्हता. त्यानंतर वैद्यकीय पथकाने त्याच्यावर बारीक नजर ठेवली, पण २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकला नाही.
संबंधित बातम्या