भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना ॲडलेडमध्ये खेळवला जात आहे. आज शनिवारी दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ३३७ धावा केल्या.
या सामन्यादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा गोलंदाजी करताना अस्वस्थ दिसत होता. त्याची अडचण पाहून फिजिओलाही मैदानात यावे लागले.
वास्तविक, बुमराहने ॲडलेड कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन डावातील ८१वे षटक आणले. त्याने षटकाची सुरुवात दमदार पद्धतीने केली. बुमराहने ट्रॅव्हिस हेडला अनेकदा बीट केले. पण त्याच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हेडने चौकार मारला. यानंतर बुमराह खाली पडला आणि त्याने पाय धरला, वेदनांमुळे तो अस्वस्थ दिसत होता. या दरम्यान, फिझिओ मैदानात आले. काही वेळानंतर बुमराह उभा राहिला आणि त्याने षटक पूर्ण केले.
दरम्यान, आजच्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर गोलंदाजी कोच मोर्ने मॉर्केल यांनी बुमराहच्या दुखपतीबाबत माहिती दिली आणि ती गंभीर नसल्याचे सांगितले.
दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत मॉर्केल म्हणाला, सर्वप्रथम बुमराह बरा आहे, त्याला फक्त क्रॅम्प्स आले होते. तुम्हाला माहिती आहे, त्यानंतरही त्याने गोलंदाजी केली आणि २ बळी मिळवले. कसोटी हा कठीण खेळ आहे आणि तो फक्त कठीण खेळाडूंसाठीच बनला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात बुमराहने ४ विकेट घेतल्या होत्या. त्याने २३ षटकात ६१ धावा देत ५ मेडन ओव्हर्स टाकल्या.
ॲडलेड कसोटीच्या पहिल्या डावात अवघ्या १८० धावा करून टीम इंडिया ऑलआऊट झाली. तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३७ धावा केल्या होत्या. त्यासाठी ट्रॅव्हिस हेडने दमदार कामगिरी केली. हेडने शतक केले. त्याने १४१ चेंडूंचा सामना करत १४० धावा केल्या. हेडच्या खेळीत १७ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.
यानंतर भारताच्या दुसऱ्या डावात ५ विकेट पडल्या. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारताने १२८ धावा केल्या होत्या. भारत अद्याप २९ धावांनी पिछाडीवर असून ५ विकेट शिल्लक आहेत. ऋषभ पंत याच्याकडून संघाला मोठा अपेक्षा आहेत.
संबंधित बातम्या