Jasprit Bumrah Injury Update : सिडनी कसोटीत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला कडवी टक्कर देत आहे. पण या दरम्यान, टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी बातमी आली आहे. दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकनंतर भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराह याने केवळ एकच षटक टाकले. यानंतर तो मैदानाबाहेर गेला.
वास्तविक, सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी (४ जानेवारी) पहिल्या सत्रात भारतीय संघाने अप्रतिम गोलंदाजी केली. भारताने ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला. पण दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होताच टीम इंडियासाठी वाईट बातमी आली. कर्णधार जसप्रीत बुमराह एक षटक टाकल्यानंतर मैदानाबाहेर गेला.
बराच वेळ तो मैदानात आला नाही. यावेळी शुभमन गिल मैदानावर संघाचे नेतृत्व करत आहे. यानंतर एक व्हिडिओ समोर आला जो भारतीय चाहत्यांना घाबरवणारा होता.
सुमारे अर्धा तास ड्रेसिंग रूममध्ये राहिल्यानंतर जसप्रीत बुमराह बाहेर येताना दिसला. बुमराह संघाच्या जर्सीऐवजी ट्रेनिंग किटमध्ये होता. तो गाडीत बसून स्टेडियमच्या बाहेर जाताना दिसला. याचा व्हिडीही समोर आला आहे.
ज्यात तो कारमध्ये बसलेला दिसत आहे. बुमराहला दुखापत झाली असून तो स्कॅनसाठी गेला असल्याचे बोलले जात आहे. मात्र, बीसीसीआय किंवा प्रसारकांकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा डाव १८५ धावांवर आटोपला. यानंतर कर्णधार जसप्रीत बुमराहने अप्रतिम गोलंदाजी केली. पहिल्या दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने सलामीवीर उस्मान ख्वाजाला बाद केले होते.
त्याने दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात मार्नस लॅबुशेनला बाद केले. जसप्रीत बुमराह या मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत ३२ विकेट घेतल्या आहेत. कोणत्याही परदेशी मालिकेतील भारतीय गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
संबंधित बातम्या