Jasprit Bumrah Coldplay Concert : ब्रिटिश रॉक बँड कोल्डप्ले भारत दौऱ्यावर होता. या बँडचा शेवटचा शो रविवारी (२६ जानेवारी) अहमदाबादमध्ये झाला. कोल्डप्लेचा शेवटचा कॉन्सर्ट अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता. या कॉन्सर्टसाठी स्टेडियममध्ये खचाखच गर्दी झाली होती.
जगभरात प्रसिद्ध असलेल्या कोल्डप्लेचे कोट्यवधी चाहते आहेत. विशेषत: या रॉक बँडचा प्रमुख गायक ख्रिस मार्टिन याचे लाखो चाहते आहेत, पण ख्रिस मार्टिन हा टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचा फॅन आहे.
ख्रिस मार्टिनने भारतातील शेवटच्या कॉन्सर्टमध्ये बुमराहबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. विशेष म्हणजे, जसप्रीत बुमराह हादेखील कोल्डप्लेच्या शेवटच्या कॉन्सर्टमध्ये पोहोचला होता. यानंतर ख्रिस मार्टिनने बुमराहसाठी स्पेशल गाणं गायले.
या कॉन्सर्टला १ लाख ३४ हजार चाहत्यांनी हजेरी लावली होती, ज्यामुळे हा या शतकातील आशियातील सर्वात जास्त चाहत्यांची उपस्थिती असलेला म्युझिकल शो ठरला. कोल्डप्लेच्या नेत्रदीपक व्हिज्युअल आणि हिट-पॅक सेटलिस्टने स्टेडियम दणाणून गेले होते.
परंतू या दरम्यान, कॅमेरा अचानक एका व्यक्तीवर जाऊन थांबला आणि तो व्यक्ती मोठ्या स्क्रिनवर दिसताच प्रचंड जल्लोष झाला. खरं तर, कॅमेऱ्याची नजर जसप्रीत बुमराहवर होती. यानंतर "बुमराह! बुमराह!" असा जल्लोष सुरू झाला. यानंतर क्रिस मार्टिनने बुमराहचे बरेच कौतुक केले आणि त्याच्यासाठी गाणे गायले.
ख्रिस मार्टिनने त्याच्या आवाजात, “जसप्रीत बुमराह, माय ब्यूटीफुल ब्रदर। द बेस्ट बॉलर इन द होल ऑफ क्रिकेट। वुई डु नॉट एन्जॉय डिस्ट्रॉइंग इंग्लंड विथ द विकेट्स आफ्टर विकेट्स।” असे बोल गुणगुणले.
मार्टिन गात असताना शोच्या आयोजकांनी जसप्रीत बुमराहची एक क्लिपही प्ले केली, ज्यामध्ये बुमराह इंग्लंडच्या फलंदाजांचे स्टंप उखडत असल्याचे दिसत होते. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
याआधीही ख्रिस मार्टिनने जसप्रीत बुमराहचे कौतुक केले होते, मात्र एका कार्यक्रमादरम्यान त्याने बुमराहला कमी लेखण्याची चूकही केली होती, जी त्याने पुढच्याच शोमध्ये सुधारली.
जसप्रीत बुमराह सध्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. तो आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दिसू शकतो.
संबंधित बातम्या