टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नई येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात शानदार गोलंदाजी केली. या सामन्यात बुमराहने ४०० आंतरराष्ट्रीय विकेट्स पूर्ण केल्या आहेत. ४०० किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा तो भारताचा १०वा गोलंदाज आहे.
बुमराहने भारताचा माजी गोलंदाज हरभजन सिंगचा विक्रम मोडला आहे. यासोबतच त्याचा एका विशेष यादीत समावेश झाला आहे.
बुमराहने आतापर्यंत भारतासाठी १९६ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने हे वृत्त लिहिपर्यंत २२७ डावात ४०० बळी घेतले होते. बुमराहची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे एका डावात १९ धावांत ६ विकेट्स घेणे.
बुमराहने हरभजन सिंगचा विक्रम मोडला आहे. भारतासाठी सर्वात कमी डावात ४०० बळी घेण्याच्या बाबतीत त्याने भज्जीला मागे सोडले आहे.
बुमराहने २२७ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. तर हरभजनने २३७ डावात ही कामगिरी केली होती. या यादीत रविचंद्रन अश्विन पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने २१६ डावात ४०० बळी घेतले होते. तर कपिल देव यांनी २२० डावात ४०० बळी पूर्ण केले होते.
टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत बुमराह सहाव्या स्थानावर आहे. या यादीत कपिल देव पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांनी ६८७ विकेट घेतल्या आहेत. झहीर खान ६१० विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. जवागल श्रीनाथ तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ५५१ विकेट घेतल्या आहेत.
चेन्नई कसोटीत बांगलादेशच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने दमदार गोलंदाजी केली. वृत्त लिहिपर्यंत त्याने ८ षटकात ३४ धावा देत ३ बळी घेतले आहेत. यात १ मेडन ओव्हरही टाकण्यात आली. बुमराहने शादमान इस्लाम, मुशफिकुर रहीम आणि हसन महमूद यांना बाद केले.