जसप्रीत बुमराह हा गेल्या काही वर्षांपासून टीम इंडियाचा सर्वात मोठा मॅचविनर म्हणून उदयास आला आहे. यॉर्कर किंग बुमराह आज (६ डिसेंबर) ३१ वर्षांचा झाला आहे. जसजशी त्याच्या विकेट्सची संख्या वाढत आहे तसतशी त्याची संपत्तीही वाढत आहे.
अलीकडे जसप्रीत बुमहारने भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवले आणि पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघाला विजय मिळवून दिला. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा २९५ धावांनी पराभव केला. जसप्रीत बुमराहने एकूण ८ विकेट घेतल्या. बुमहारच्या ३१व्या वाढदिवसानिमित्त, त्याच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊया.
२०२४ पर्यंत जसप्रीत बुमराहची एकूण संपत्ती सुमारे ६० कोटी रुपये आहे. यामध्ये बीसीसीआय करार, मॅच फी, जाहिराती आणि आयपीएलमधील कमाईचाही समावेश आहे.
जसप्रीत बुमराहचा बीसीसीआय करारानुसार A+ श्रेणीमध्ये समावेश करण्यात आला आहे. यातून त्याला वर्षाला ७ कोटी रुपये मिळतात. याशिवाय त्याला प्रत्येक कसोटीसाठी १५ लाख रुपये, एकदिवसीय सामन्यासाठी ७ लाख रुपये आणि टी-20 सामन्यासाठी ३ लाख रुपये मॅच फी मिळते.
अलीकडेच मुंबई इंडियन्सने त्याला आयपीएल २०२५ च्या मोसमासाठी १८ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले. याशिवाय बुमराह एका जाहिरातीसाठी १.५ ते २ कोटी रुपये आकारतो.
बुमराह Dream11, Asics, OnePlus Wearables, Juggle, Boat, Seagram's Royal Stag, CultSport, Astrolo, Unix आणि BharatPe सारख्या ब्रँड्सच्या जाहीराती करतो.
बुमराहकडे मुंबई (२ कोटी रुपये) आणि अहमदाबाद (३ कोटी रुपये) मध्ये आलिशान घरे आहेत. त्याच्याकडे उत्तम कारचे कलेक्शनही आहे. यामध्ये Mercedes Maybach S560, Nissan GT-R, Range Rover Velar, Toyota Innova Crysta आणि Hyundai Verna यांचा समावेश आहे.
जसप्रीत बुमराहने अल्पावधीतच भारतासाठी मोठी कामगिरी केली आहे. बुमराहने भारतासाठी ४१ कसोटी सामन्यांमध्ये १८१ विकेट्स, ८९ एकदिवसीय सामन्यांमध्ये १४९ बळी आणि ७० टी-20 सामन्यांमध्ये ८९ बळी घेतले आहेत. बुमराहने एकूण ४१९ विकेट घेतल्या आहेत. अलीकडची कामगिरी पाहता बुमराह लवकरच ५०० बळी घेण्याचा पराक्रम करेल.
संबंधित बातम्या