मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  James anderson record : ४१ वर्षांच्या जेम्स अँडरसनने रचला इतिहास, कसोटीत ७०० विकेट घेणारा पहिला वेगवान गोलंदाज

James anderson record : ४१ वर्षांच्या जेम्स अँडरसनने रचला इतिहास, कसोटीत ७०० विकेट घेणारा पहिला वेगवान गोलंदाज

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 09, 2024 10:55 AM IST

James Anderson 700 Wickets record news : इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनने कसोटी करिअरचे ७०० विकेट पूर्ण केले आहेत. कुलदीप यादव अँडरसनचा ७०० वा विकेट ठरला. कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) ७०० विकेट घेणारा जेम्स अँडरसन हा जगातील पहिलाच वेगवान गोलंदाज ठरला आहे.

James Anderson : ४१ वर्षांच्या जेम्स अँडरसनने रचला इतिहास, कसोटीत ७०० विकेट घेणारा पहिला वेगवान गोलंदाज
James Anderson : ४१ वर्षांच्या जेम्स अँडरसनने रचला इतिहास, कसोटीत ७०० विकेट घेणारा पहिला वेगवान गोलंदाज (AP)

India Vs England 5th Test Dharamsala : भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारपासून (७ मार्च) ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळवला जात आहे. धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे.

या सामन्यात भारताचा पहिला डाव आज (९ मार्च) सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ४७७ धावांवर संपला. इंग्लंडने पहिल्या डावात २१८ धावा केल्या होत्या. अशाप्रकारे भारताने इंग्लंडवर २५९ धावांची आघाडी घेतली.

या दरम्यान, इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनने कसोटी करिअरचे ७०० विकेट पूर्ण केले आहेत. कुलदीप यादव अँडरसनचा ७०० वा विकेट ठरला. कसोटी क्रिकेटमध्ये ७०० विकेट घेणारा जेम्स अँडरसन हा जगातील पहिलाच वेगवान गोलंदाज ठरला आहे. ४१ वर्षांचा अँडरसन इतरांसाठी प्रेरणा बनला आहे. या वयात वेगवान गोलंदाज म्हणून खेळणे अजिबात सोपे नाही.

जेम्स अँडरसनचा ६९९ विकेट हा शुभमन गिल होता. वयाच्या ४१ व्या वर्षी त्याने हा विक्रम केला.

भारताविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी जेम्स अँडरसन हा इतिहास रचेल, अशी अपेक्षा होती. ही मालिका सुरू होण्यापूर्वी जेम्स अँडरसनच्या खात्यात ६९० कसोटी विकेट्स होत्या. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.

पण तो दुसऱ्या कसोटीत म्हणजेच विशाखापट्टणम कसोटीत खेळला. त्या सामन्यात त्याने ५ बळी घेतले होते. यानंतर जेम्स अँडरसनने राजकोट कसोटीत एक विकेट घेतली, येथे तो पूर्णपणे निष्प्रभ ठरला. त्यानंतर रांचीमध्ये त्याने २ बळी घेतले.

जेम्स अँडरसनची क्रिकेट कारकीर्द

जेम्स अँडरसनने २००३ मध्ये लॉर्ड्सवर झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून आतापर्यंत तो १८७ सामने खेळला आहे. आता फक्त सचिन तेंडुलकरने अँडरसनपेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत. सचिनच्या नावावर २०० कसोटी सामने आहेत. तसेच, जेम्स अँडरसनने आतापर्यंत १९४ एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्याच्या नावावर २६९ विकेट्स आहेत. त्याने १९ टी-20 सामन्यांमध्ये १८ विकेट्स घेतल्या आहेत.

IPL_Entry_Point