India vs England 2nd Test Day 3, Vizag : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून (२ फेब्रुवारी) विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. आज (४ फेब्रुवारी) सामन्याचा तिसरा दिवस असून भारतीय संघाचा दुसरा डाव सुरू आहे.
पण टीम इंडियासाठी दिवसाची सुरुवात खूपच खराब झाली. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच रोहित शर्माच्या रूपाने भारताला पहिला धक्का बसला. रोहित शर्मा जेम्स अँडरसनच्या एका सुंदर चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. रोहित शर्माने २१ चेंडूत १३ धावा केल्या.
जागतिक क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा क्लासिकल चेंडूंची स्टोरी सांगितली जाईल, तेव्हा जेम्स अँडरसनने टाकलेल्या या चेंडूची निश्चित चर्चा होईल. जेम्स अँडरसनने टाकलेला हा चेंड स्वप्नवत होता. हवेत स्विंग झालेला चेंडू रोहितला काही समजायच्या आत चेंडू स्टंपवर आदळला. आता रोहित बाद झालेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पहिल्या डावातही रोहित शर्मा काही विशेष करू शकला नव्हता. पहिल्या डावात तो १४ धावा करून शोएब बशीरची शिकार झाला होता.
४१ वर्षीय जेम्स अँडरसनने रोहितच्या विकेटनंतर पहिल्या डावात द्विशतक करणाऱ्या यशस्वी जैस्वालचीही विकेट काढली. जैस्वाल दुसऱ्या डावात १७ धावा करून बाद झाला.
तत्पूर्वी, या कसोटी सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदजी केली आणि सर्वबाद ३९६ धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात २५३ धावात गारद झाला आणि भारताला १५३ धावांची आघाडी मिळाली. आता भारताचा दुसरा डाव सुरू असून हे वृत्त लिहिपर्यंत शुभमन गिल अर्धशतक करून खेळत आहे.