अनेक वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आज (२२ जानेवारी) अयोध्येत श्री रामांची प्रतिष्ठापणा झाली. यामुळे संपूर्ण देशात आज दिवाळीसारखे वातावरण आहे. देश-विदेशातील लोक भगवान श्री रामांच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते.
राम जन्मभूमी असलेल्या अयोध्या नगरीला हजारो क्विंटल फुलांनी सजवण्यात आले होते. सगळीकडे जल्लोषाचे वातावरण होते. रामलल्लाच्या प्रतिष्ठापणा सोहळ्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर लोकांनी अयोध्येत उपस्थिती लावली. या सोहळ्यासाठी ८ हजार अतिमहत्वाच्या लोकांना निमंत्रण देण्यात आले होते.
याशिवाय क्रिकेटमधून या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सचिन तेंडुलकर, रवींद्र जडेजा, अनिल कुंबळे आणि व्यंकटेश प्रसाद हे सहभागी झाले.
मात्र, या सर्वांमध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरची एक खास पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. वॉर्नरने सोशल मीडियावर राम मंदिराशी संबंधित पोस्ट केली आहे.
डेव्हिड वॉर्नरने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत भगवान राम दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये वॉर्नरने लिहिले की, “जय श्री राम इंडिया... ” डेव्हिड वॉर्नरची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरलदेखील झाली.
यापूर्वी आज सकाळी वीरेंद्र सेहवाग आणि हरभजन सिंग यांसारख्या क्रिकेटपटूंनी राम मंदिर प्राण प्रतिष्ठापणावर पोस्ट केली होती. वीरेंद्र सेहवागने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, मी भावनिक आहे, मी आनंदी आहे, मी प्रतिष्ठित आहे, मी शरणागत आहे, मी समाधानी आहे, मी फक्त राममय आहे. सियावर रामचंद्रजींचा जय. ज्यांच्यामुळे हे शक्य झाले आणि ज्यांनी त्याग केले त्या सर्वांचे आभार. जय श्री राम."
त्याचवेळी हरभजन सिंगने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, आजचा दिवस एक ऐतिहासिक दिवस आहे, कारण आपले परमपूज्य भगवान श्री रामलल्ला २२ जानेवारी २०२४ रोजी त्यांच्या जन्मस्थानी येत आहेत. या निमित्ताने मी श्री रामांकडे प्रार्थना करतो, की त्यांनी मानवाला शांती, प्रगती आणि समृद्धी मिळावून द्यावी."