T20 Cricket : अख्खा संघ ७ धावांत गारद! आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात पहिल्यांदाच घडला असा प्रकार
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  T20 Cricket : अख्खा संघ ७ धावांत गारद! आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात पहिल्यांदाच घडला असा प्रकार

T20 Cricket : अख्खा संघ ७ धावांत गारद! आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात पहिल्यांदाच घडला असा प्रकार

Nov 26, 2024 04:34 PM IST

Ivory Coast vs Nigeria All Out On 7 Runs : टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आयव्हरी कोस्टचा संघ अवघ्या ७ धावांत ऑलआऊट झाला. नायजेरियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ही घटना घडली.

T20 Cricket : अख्खा संघ ७ धावांत गारद! आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात घडला असा प्रकार
T20 Cricket : अख्खा संघ ७ धावांत गारद! आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात घडला असा प्रकार

आंतराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये एक लाजिरवाणी घटना घडली आहे. टी-20 इंटरनॅशनल सामन्यात एक संघ अवघ्या ७ धावांवर ऑलआऊट झाला आहे. हा प्रकार पुरुषांच्या T20 विश्वचषक आफ्रिका उप-प्रादेशिक पात्रता क २०२४ मधील एका सामन्यात घडला आहे.

 पात्रता फेरीतील पाचवा सामना नायजेरिया आणि आयव्हरी कोस्ट यांच्यात झाला. या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला आयव्हरी कोस्ट संघ ७.३ षटकात अवघ्या ७ धावांत सर्वबाद झाला. टी-20 आंतरराष्ट्रीय इतिहासातील ही सर्वात निच्चांकी धावसंख्या आहे.

याआधी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावा करण्याचा विक्रम मंगोलिया आणि आयल ऑफ मॅनच्या नावावर होता. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये दोन्ही संघ प्रत्येकी १० धावांवर ऑलआऊट झाले होते. पण टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच संघ एकाअंकी धावसंख्येवर ऑलआऊट झाला.

नायजेरियाने २७१ धावा ठोकल्या

या सामन्यात नायजेरियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि २० षटकात ७ बाद २७१ धावा केल्या. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही आठव्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या होती.

यावेळी यष्टीरक्षक फलंदाज सेलीम सलाझने ५३ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ११२ धावा केल्या. सेलीम सलाऊ निवृत्त होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. याशिवाय इसाक ओकपेने २३ चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ६५ धावा केल्या. तर सुलेमान रनसेवेने ८ चौकारांच्या मदतीने ५० धावा केल्या.

त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना आयव्हरी कोस्ट संघ अवघ्या ७ धावांत सर्वबाद झाला आणि नायजेरियाने २६४ धावांनी विजय मिळवला. T20 आंतरराष्ट्रीय इतिहासातील हा तिसरा सर्वात मोठा विजय ठरला.

Whats_app_banner