इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचा (ISPL) दुसरा सीझन सध्या प्रचंड चर्चेत आहे. बॉलीवूड कलाकार अमिताभ बच्चन, हृतिक रोशन, सैफ अली खान यांसारखी मोठी नावे या स्पर्धेशी जोडली गेली आहेत. टेनिस बॉलने खेळल्या जाणाऱ्या या १०-१० षटकांच्या स्पर्धेत अनेक नवोदित खेळाडू आपले नशीब आजमावत आहेत. या खेळाडूंमधील एक नाव म्हणजे सुमित ढेकळे.
ISPL मध्ये रविवारी (९ फेब्रुवारी) रात्री माझी मुंबई आणि चेन्नई सिंघम हे दोन संघ आमनेसामने होते. या सामन्यात माझी मुंबई संघाने चेन्नई सिंघमचा २४ धावांनी पराभव केला. यासह मुंबईचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आला आहे.
आता बुधवारी क्वालिफायर-१ मध्ये मुंबईचा सामना फाल्कन रायझर्स हैदराबादशी होणार आहे. चेन्नई स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पराभवानंतरही चेन्नईचा कर्णधार सुमित ढेकळे याच्यासाठी हा प्रवास खूपच संस्मरणीय राहिला.
सुमित ढेकळे हा या ISPL मोसमात सर्वाधिक धावा करणारा पाचवा फलंदाज आहे. त्याने १० सामन्यांत १८५ धावा केल्या आहेत. सुमित ढेकळे याने गेल्या वर्षी आपल्या नेतृत्वाने सर्वांना प्रभावित केले होते. चेन्नई सिंघम्सने राईट टू मॅच कार्ड वापरून त्याला १०.१० लाख रुपयांमध्ये रिटने होते.
विशेष म्हणजे सुमित ढेकळे याने पृथ्वी शॉ आणि यशस्वी जैस्वालसोबत क्रिकेट खेळले आहे. ३६ वर्षीय ढेकळेने मुंबईचे दिग्गज पृथ्वी शॉ, यशस्वी जैस्वाल, प्रवीण तांबे, स्वप्नील साळवी, विक्रांत औटी आणि साईराज पाटील या खेळाडूंसह उत्तर मुंबई पँथर्ससाठी टी-20 मुंबई स्पर्धेत भाग घेतला होता. २०१९ मध्ये जेतेपद पटकावले तेव्हा तो या संघाचा भाग होता.
दरम्यान यंदाच्या ISPL मधील शेवटच्या साखळी सामन्यात सुमित ढेकळेच्या चेन्नई सिंघम्सचा पराभव झाला. या सामन्याच चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर मुंबईने १० षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात १२२ धावा केल्या. प्रत्युत्तरात सिंघम्सला ६ गडी बाद ९८ धावाच करता आल्या.
संबंधित बातम्या