BCCI ने दोन दिवसांआधीच टीम इंडियातील खेळाडूंना रणजी क्रिकेट खेळण्याच्या सुचना दिल्या होत्या. पण ईशान किशनने बीसीसीआयच्या या सुचनेला केराची टोपली दाखवली आहे. आजपासून (१६ फेब्रुवारी) रणजी ट्रॉफीमध्ये झारखंड आणि राजस्थान सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात इशान किशन खेळणे अपेक्षित होते, पण इशान या सामन्यातही खेळताना दिसला नाही.
इशान किशनने पुन्हा एकदा बीसीसीआयच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले आहे. विशेष म्हणजे बीसीसीआयने आयपीएल खेळण्यासाठीही रणजीचे किमान तीन सामने खेळणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे आता इशान किशनवर काय कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इशान किशनची ही वृत्ती बंडखोरी मानता येईल. वास्तविक, डिसेंबरमध्ये ईशानने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून आपले नाव मागे घेतले होते. त्यावेळी बीसीसीआयने सांगितले होते की, ईशानने वैयक्तिक कारणांमुळे हा ब्रेक घेतला आहे. मात्र, नंतर एका वृत्तानुसार ईशानने मानसिक थकव्यामुळे संघातून माघार घेतल्याचे समोर आले.
दरम्यान, इशानने जेव्हा ब्रेक मागितला होता, तेव्हा त्याला पुन्हा संघात परतण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल, असे सांगण्यात आले होते. पण आता ईशान देशांतर्गत क्रिकेटकडे पाठ फिरवून आयपीएलची तयारी करत आहे. इशानच्या या वागणुकीवर बीसीसीआयसह हेडकोच राहुल द्रविड नाराज असल्याचे दिसून आले.
इशान किशनच्या या वृत्तीमुळे त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेतही संधी मिळाली नाही. इंग्लंड कसोटी मालिकेतही निवड समितीने त्याच्या जागी ध्रुव जुरेलला संधी दिली आहे. आता ईशानच्या बंडखोर वृत्तीला बीसीसीआय कसे उत्तर देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.