Bcci Central Contract : टीम इंडियाचे क्रिकेटपटू ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. रणजी ट्रॉफीमध्ये न खेळणे ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना महागात पडू शकते. बीसीसीआयने वारंवार सांगूनही या दोन्ही खेळाडूंनी रणजी ट्रॉफीकडे दुर्लक्ष केले आहे.
यामुळे आता बीसीसीआयने ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या दोघांना केंद्रीय करारातून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
एका आघाडीच्या वृत्तपत्रानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच याची घोषणा करू शकते. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, अजित आगरकरच्या नेतृत्वाखाली निवडकर्त्यांनी २०२३-२४ हंगामासाठी केंद्रीय करारात असलेल्या खेळाडूंची यादी जवळपास निश्चित केली आहे. बीसीसीआय लवकरच याबाबत घोषणा करेल'.
बीसीसीआयच्या आदेशानंतरही ईशान किशन आणि श्रेयस अय्यर देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसले नाहीत. ईशान बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहे. त्याला रणजी खेळण्यास सांगण्यात आले होते, पण तो त्याकडे दुर्लक्ष करून बडोद्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यासोबत आयपीएलचा सराव करताना दिसला. तो रणजी ट्रॉफीमध्ये झारखंडसाठीे खेळला नाही.
तर श्रेयस अय्यर याला आसामविरुद्धचा सामना खेळण्यास सांगण्यात आले होते, पण तोही या सामन्यात दिसला नाही. आता शुक्रवारपासून बडोद्याविरुद्धच्या रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीलाही तो मुकणार आहे.
श्रेयस अय्यरने मुंबई क्रिकेट असोसिएशनला पाठीच्या दुखापतीचे कारण दिले आहे. मात्र NCA चे क्रीडा विज्ञान आणि औषध विभागाचे प्रमुख नितीन पटेल यांनी बीसीसीआय आणि राष्ट्रीय निवड समितीला ईमेल पाठवून श्रेयस पूर्णपणे फिट असल्याचे सांगितले आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी गेल्याच आठवड्यात केंद्रीय करारात असलेल्या खेळाडूंना आणि भारत अ संघाच्या खेळाडूना इशारा दिला होता, की रणजी ट्रॉफीकडे दुर्लक्ष करणे खपवून घेतले जाणार नाही आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांना या संदर्भात कारवाई करण्याची पूर्णपणे मोकळीक दिली जाईल'.