Ishan Kishan Team India : टीम इंडियाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन सध्या संघाबाहेर आहे. ईशानने नोव्हेंबर २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका खेळली होती. यानंतर त्याने स्वतः दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली. तेव्हापासून ईशान संघातून बाहेर आहे.
इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेतही त्याचे नाव नाही. अलीकडेच अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेत इशानबद्दल अपडेट दिले होते.
ईशानने स्वतः त्याला ब्रेक देण्याची विनंती केली होती, असे द्रविडने सांगितले होते. सोबतच, इशानला देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचा सल्लाही द्रविडने दिला होता. मात्र, द्रविडच्या या सल्ल्याकडे इशाानने दुर्लक्ष केले, तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना दिसत नाही.
सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळली जात असून, त्यात ईशान झारखंडकडून खेळताना दिसत नाही आहे. तसेच, ईशानने बीसीसीआय आणि झारखंड क्रिकेट असोसिएशनला (JCA) त्याच्या पुढील प्लॅनबाबतही अद्याप काहीच माहिती दिलेली नाही. तो देशांतर्गत क्रिकेट खेळणार आहे की नाही याची माहितीही ईशानने जेसीएला दिलेली नाही.
दरम्यान, एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, ईशानसोबत असेच सुरू राहिल्यास त्याला टी-20 विश्वचषक खेळणे कठीण होईल. रिपोर्टनुसार, बीसीसीआय सध्या ईशानच्या प्लॅनबाबतही अंधारात आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियात निवड होणे, सध्यातरी कठीण आहे.
झारखंड क्रिकेट असोसिएशनलाही इशानच्या प्लॅनबद्दल काहीही माहिती नाही. अशा परिस्थितीत, अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितीला इशानचे देशांतर्गत क्रिकेटपासून दूर राहणे आवडलेले नाही. अशा स्थितीत टी-20 विश्वचषकातून ईशानचा पत्ता कट होऊ शकतो.
इशानच्या अनुपस्थितीत, निवड समिती संजू सॅमसन आणि जितेश शर्मा यांची विश्वचषकासाठी यष्टिरक्षक म्हणून निवड करू शकते.