India vs Afghanistan T20 Series : अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. या संघात रोहित शर्मा, विराट कोहली आणि संजू सॅमसन यांचे पुनरागमन झाले. तर केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांचा या अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी विचार करण्यात आला नाही.
इशान किशनची टी-20 संघात निवड झाली नाही, यामुळे क्रिकेट चाहते चांगले नाराज झाले होते. इशान वर्ल्डकप संघातही होता, पण त्याला केवळ एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. तो संघासोबत असतो, पण सामना खेळण्याची संधी मिळत नाही. आता अफगाणिस्तानविरुद्ध त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली असती, पण त्याची निवडच केली गेली नाही, असे चाहत्यांचे म्हणणे आहे.
पण आता इशान किशनबाबत एक नवीन आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. वास्तविक, सततच्या प्रवासामुळे मानसिक थकवा आल्याने इशान किशनने बीसीसीआयकडे ब्रेक मागितला होता. यानंतर BCCI ने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून किशनला ब्रेक दिला आणि घरी आराम करण्यास पाठवले.
पण ब्रेक मिळाल्यानंतर ईशान किशन दुबईत पार्टी करताना दिसला. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी इशान किशन तयार असल्याचेही वृत्त होते. मात्र यावेळी निवड समितीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या या मालिकेचा भाग नाहीत. असे असूनही ईशानची संघात जागा मिळाली नाही.
यावरून हे समजू शकते की कदाचित बीसीसीआय ईशान किशनच्या या अशा वृत्तीवर नाराज आहे. भारताला २५ जानेवारीपासून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिका खेळायची आहे. यासाठीचा संघ अद्याप जाहीर झालेला नाही. आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याला संधी मिळते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.