युवा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन बराच काळ टीम इंडियातून बाहेर आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये त्याने भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. यानंतर ईशानला अद्याप टीम इंडियात पुनरागमन करता आलेले नाही.
मात्र, यादरम्यान ईशान किशनची लॉटरी लागली आहे. ईशानला एक महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. इशानला झारखंड क्रिकेट संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.
ईशान किशन आता देशांतर्गत क्रिकेटच्या माध्यमातून टीम इंडियात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करणार आहे. ईशान बुची बाबू क्रिकेट स्पर्धेत खेळणार आहे. त्याच्यासोबत टीम इंडियाचे स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर हेही या स्पर्धेत खेळणार आहेत.
क्रिकइन्फोने दिलेल्या बातमीनुसार, झारखंडने इशान किशनला कर्णधार बनवले आहे. तो बुची बाबू स्पर्धेत खेळणार आहे. ही स्पर्धा तामिळनाडूमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी तो लवकरच चेन्नईला पोहोचणार आहे.
इशानचे नाव पहिल्या यादीत नव्हते. मात्र नंतर त्याला ही जबाबदारी देण्यात आली. ईशानने स्वतः या स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर त्याने झारखंड राज्य क्रिकेट संघटनेशी चर्चा केली. या स्पर्धेनंतर ईशान रणजी ट्रॉफीमध्येही खेळू शकतो.
देशांतर्गत क्रिकेट न खेळल्यामुळे टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंवर बरीच टीका झाली होती. तेव्हापासून हा बदल दिसून येत आहे. इशानने त्याचा शेवटचा देशांतर्गत प्रथम श्रेणी सामना डिसेंबर २०२२ मध्ये खेळला होता. तेव्हापासून तो रणजी ट्रॉफीपासून दूर आहे. हा निर्णय ईशानसाठी खूप मोठा होता. कारण देशांतर्गत क्रिकेट न खेळल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याला कराराच्या यादीतून काढून टाकले होते.
ईशानने जुलै २०२३ मध्ये भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. वेस्ट इंडिज दौऱ्यावर तो टीम इंडियासोबत होता. शेवटचा एकदिवसीय सामना ऑक्टोबर २०२३ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळला गेला होता. इशानने भारताकडून शेवटचा टी-२० सामना नोव्हेंबर २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता.