टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. २५ जानेवारीपासून ही मालिका भारतीय भुमीवर सुरू होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया लवकरच या मालिकेची तयारी सुरू करणार आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील संघात जवळपास तेच खेळाडू आहेत जे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेले होते. मात्र, केवळ यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन याची या संघात निवड झालेली नाही. त्याच्या जागी ध्रुव जुरेल संघात आला आहे.
भारतीय संघाची घोषणा होण्यापूर्वीच ईशान किशनला संघात स्थान मिळणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात होती.
अशा परिस्थितीत आता त्याच्याबाबत एक नवीन गोष्ट समोर आली आहे. इशान किशनने प्रशिक्षक राहुल द्रविड याच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले आहे. त्यामुळेच त्याचे नाव अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 आणि आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत नाही.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ईशान किशन भारतीय संघासोबत होता, मात्र कसोटी मालिकेपूर्वीच त्याने मानसिक विश्रांती हवी, असे कारण सांगून ब्रेक घेतला आणि भारतात परतला.
पण या ब्रेकदरम्यान ईशान किशन एका टीव्ही शोमध्ये दिसला आणि त्यानंतर तो दुबईला गेला. येथे तो पार्टी करताना दिसला. ब्रेकवरून परतल्यानंतर ईशानने रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी झारखंड राज्य क्रिकेट संघटनेशी संपर्क साधायला हवा होता. पण त्याने तसे केले नाही.
मानसिक थकव्याचे कारण देत टीम इंडियातून ब्रेक घेतलेला ईशान देशांतर्गत क्रिकेटकडे दुर्लक्ष करून टीव्ही शो आणि दुबईत पार्टी करताना दिसला. अशा स्थितीत त्याच्या या वृत्तीमुळे बीसीसीआयने हा कठोरपणा दाखवल्याचे मानले जात आहे.
झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशननेही ईशान किशनने आपल्या उपलब्धतेबद्दल त्यांच्याशी संपर्क साधला नसल्याचे सांगितले.
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी हेड कोच राहुल द्रविडने पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान इशान किशनबाबतही काही प्रश्नही विचारण्यात आले. यावर द्रविडने उत्तर दिले की त्याच्यावर कोणत्याही प्रकारची शिस्तभंगाची कारवाई करण्यात आलेली नाही.
अफगाणिस्तानविरुद्ध निवडीसाठी तो उपलब्ध नव्हता. तो उपलब्ध होताच त्याच्या नावाचा निश्चितपणे विचार केला जाईल, परंतु यादरम्यान त्याने हे देखील स्पष्ट केले की इशानला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करावे लागेल.
प्रशिक्षक राहुल द्रविडने ज्या प्रकारे इशानला प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की टीम मॅनेजमेंट त्याच्यावर खूश नाही. झारखंड संघ १२ जानेवारीपासून रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्रासोबत दुसरा सामना खेळत आहे, पण इशानचे नाव संघात नाही.
अशा परिस्थितीत इशान किशन प्रशिक्षक राहुल द्रविडच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्टपणे मानले जाऊ शकते.
या संपूर्ण प्रकरणाबाबत अधिकृतरित्या काहीही उघड नाही. पण इशान किशनला ज्या प्रकारे टी-20 आणि आता कसोटी संघातून वगळण्यात आले आहे, त्यावरून त्याचे करिअर धोक्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.
संबंधित बातम्या