Irfan Pathan Saved 9 Runs In Last Over : भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण सध्या US मास्टर्स T10 लीग 2023 मध्ये कॅलिफोर्निया नाईट्सकडून खेळत आहे. इरफान पठाणच्या गोलंदाजीची लीगमध्ये सर्वत्र चर्चा होत आहे. ड्वेन स्मिथ आणि हॅमिल्टन मसाकादझा या दोन अनुभवी फलंदाजांसमोर त्याने शेवटच्या षटकात ९ धावांचा बचाव करुन संघाला विजय मिळवून दिला.
२०१२ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेल्या इरफान पठाणने वयाच्या ३८ व्या वर्षीही आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
US मास्टर्स T10 लीग या स्पर्धेत कॅलिफोर्निया नाईट्स आणि अटलांटा रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात इरफान पठाणने ही कामगिरी केली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कॅलिफोर्निया नाईट्स संघाने १० षटकात २ बाद ९४ धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना अटलांटा रायडर्सला १० षटकांत ४ गडी गमावून ८९ धावाच करता आल्या. या सामन्यात कॅलिफोर्निया नाईट्सला विजयी करण्यात इरफान पठाणने महत्त्वाची भूमिका बजावली.
अखेरच्या षटकात अटलांटा रायडर्सला विजयासाठी ९ धावांची गरज होती. कॅलिफोर्निया नाईट्सकडून शेवटचे षटक टाकणाऱ्या इरफान पठाणने अवघ्या ३ धावा देत आपल्या संघाला ५ धावांनी विजय मिळवून दिला.
शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर मसाकादझा स्ट्राईकवर होता, या ओव्हरचा पहिला चेंडू इरफानने वाईड टाकला. पुढच्या चेंडूवर मसाकादझाने एक धाव घेतली. यानंतर ड्वेन स्मिथ क्रीझवर आला. तिसरा चेंडू इरफानने फलंदाजापासून दूर ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकला, या चेंडूवरही एकच धाव आली. यानंतर चौथ्या चेंडूवर पठाणने मसाकादझाला झेलबाद केले.
पाचव्या चेंडूवर फलंदाजीला आलेला नवा फलंदाज हम्माद आझम खाते न उघडताच धावबाद झाला. आता शेवटच्या चेंडूवर ६ धावांची गरज होती आणि ड्वेन स्मिथ क्रीजवर उपस्थित होता. पण शेवटच्या चेंडूवर स्मिथला काहीच करता आले नाही, त्याने जोराने बॅट फिरवली पण चेंडू मिस झाला आणि शेवटच्या चेंडूवर एकही धाव आली नाही. अशाप्रकारे कॅलिफोर्निया नाईट्सने सामना ५ धावांनी जिंकला.