दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आयर्लंडने दक्षिण आफ्रिकेचा १० धावांनी पराभव केला. यासाह मालिकेत आयर्लंडने १-१ अशी बरोबरी साधली.
याआधी झालेल्या वनडे मालिकेत अफगाणिस्तानने आफ्रिकन संघाचा २-१ असा पराभव केला होता. अफगाणिस्तानपाठोपाठ आता आयर्लंडनेही आफ्रिकेचा धुव्वा उडवला आहे. या दोघांमधील मालिकेतील दुसरा टी-२० सामना अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर खेळला गेला.
तत्पूर्वी, आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करणाऱ्या आयरिश संघाची सुरुवात चांगली झाली.
प्रथम फलंदाजीला आलेल्या आयर्लंडने २० षटकांत ६ बाद १९५ धावा ठोकल्या. संघासाठी सलामी देणाऱ्या रॉस अडायरने सर्वात मोठी खेळी खेळली आणि ५८ चेंडूंत ५ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने १०० धावा केल्या. याशिवाय कर्णधार पॉल स्टर्लिंगने ३१ चेंडूंत ७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५२ धावा केल्या.
यानंतर १९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा १० धावांनी पराभव झाला. संघाला २० षटकात ९ गडी बाद १८५ धावाच करता आल्या. रीझा हेंड्रिक्स आणि मॅथ्यू ब्रेट्झके यांनी संघाकडून सर्वात मोठी खेळी खेळली. हेंड्रिक्सने ३२ चेंडूंत ६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५१ धावा केल्या. तर ब्रित्झकेने ४१ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ५१ धावा केल्या. मात्र, या दोघांच्या खेळी संघाला विजयाची रेषा ओलांडण्यास पुरेशा ठरल्या नाहीत.
आयर्लंडकडून रॉय अडायरने शानदार शतक झळकावले. त्यानंतर त्याचा भाऊ मार्क अडायर याने गोलंदाजीत कमाल केली. मार्क अडायरने आफ्रिकेचे ४ फलंदाज बाद केले.
शेवटच्या दोन षटकांत दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २३ धावांची गरज असताना मार्क अडायरने १९व्या षटकात ५ धावांत ३ बळी घेतले. या सामन्यात त्याने एकूण ४ विकेट घेतल्या. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला १८५ धावा करता आल्या आणि १० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.