मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024 : लिलावात कोणीच घेतलं नाही, पण आता सरफराजसाठी या संघांमध्ये रंगलीय चुरस, आयपीएल खेळणार?

IPL 2024 : लिलावात कोणीच घेतलं नाही, पण आता सरफराजसाठी या संघांमध्ये रंगलीय चुरस, आयपीएल खेळणार?

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 20, 2024 01:54 PM IST

Sarfaraz Khan IPL 2024 : भारताकडून पदार्पण करण्यापूर्वी सरफराज खानने आयपीएलमध्ये ५० सामने खेळले. मात्र, आयपीएल २०२४ च्या लिलावात तो अनसोल्ड राहिला. पण आता काही आयपीएल संघ त्याला संघात घेण्यास इच्छुक आहेत.

Sarfaraz Khan IPL 2024
Sarfaraz Khan IPL 2024 (AFP)

मुंबईचा युवा फलंदाज सरफराज खान याला इंग्लंडविरुद्धच्या राजकोट कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आपल्या पदार्पणाच्या कसोटीतच सरफारजने दमदार कामगिरी करत दोन्ही डावात अर्धशतकं ठोकली.

अशाप्रकारे पदार्पणाच्याच सामन्यात अर्धशतक करणारा सरफराज चौथा भारतीय फलंदाज ठरला. सरफराजच्या स्वप्नवत पदार्पणानंतर आता आयपीएलमधील काही संघ त्याला आपल्या संघात समाविष्ट करण्याच्या तयारीत आहेत.

सरफारजने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ६६ चेंडूंत ९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६२ धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या डावात सरफराजने ७२ चेंडूत नाबाद ६८ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ६ चौकार आणि ३ षटकार आले.

सरफराजला संघात घेण्यास हे संघ उत्सुक

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएलचे तीन संघ सरफराजसाठी चांगली रक्कम देण्यास तयार आहेत. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सचा समावेश आहे. 

आयपीएल २०२४ च्या मिनी लिलावात सरफराज खान अनसोल्ड राहिला होता. गेल्या मोसमात तो दिल्लीकडून खेळला, पण अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. अशा परिस्थितीत फ्रँचायझीने त्याला लिलावापूर्वी रीलीज केले होते.

सोबतच असेही समोर आले आहे की, भारतासाठी पदार्पण केल्यानंतर सरफराज खानला खरेदी करण्यासाठी अनेक आयपीएल संघांमध्ये शर्यत सुरू आहे. त्याच्यासाठी संघ मोठी रक्कम देण्यास तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत, लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर सरफराज आयपीएलमध्ये कसा प्रवेश करू शकतो? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

IPL मध्ये सरफराजची एन्ट्री कशी होऊ शकते?

आयपीएल संघ सरफराजला ट्रेडद्वारे त्यांच्या संघात समाविष्ट करू शकत नाही, कारण ट्रेड विंडो बंद झाली आहे. यानंतर आता सरफराज आयपीएलमध्ये एकाच मार्गाने प्रवेश करू शकतो आणि तो म्हणजे लीग सुरू होण्यापूर्वी किंवा सुरू असताना कोणत्याही संघाचा खेळाडू जखमी झाला तर त्याला बदली खेळाडू म्हणून संघात घेतले जाऊ शकते. याशिवाय या मोसमात सरफराजकडे दुसरा पर्याय नाही.

IPL_Entry_Point