IPL Mega Auction 2025 : डिसेंबरमध्ये आयपीएलचा मेगा लिलाव, संघांना किती खेळाडू रिटेन करता येणार? पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL Mega Auction 2025 : डिसेंबरमध्ये आयपीएलचा मेगा लिलाव, संघांना किती खेळाडू रिटेन करता येणार? पाहा

IPL Mega Auction 2025 : डिसेंबरमध्ये आयपीएलचा मेगा लिलाव, संघांना किती खेळाडू रिटेन करता येणार? पाहा

Apr 10, 2024 05:05 PM IST

IPL Mega Auction 2025 : आयपीएलमध्ये दर ३ वर्षांनी मेगा लिलाव होतो. आत्ताच्या नियमांनुसार, संघ जास्तीत जास्त ४ खेळाडू रिटेन करू शकतात, बाकीच्या खेळाडूंना रीलीज करावे लागते.

IPL Mega Auction 2025 : डिसेंबरमध्ये आयपीएलचं मेगा ऑक्शन, संघांना किती खेळाडू रिटेन करता येणार? पाहा
IPL Mega Auction 2025 : डिसेंबरमध्ये आयपीएलचं मेगा ऑक्शन, संघांना किती खेळाडू रिटेन करता येणार? पाहा (PTI)

IPL Mega Auction 2025 : भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीगचा १७वा सीझन खेळला जात आहे. पण अशातच आता आयपीएलच्या १८व्या सीझनबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची तयारी बीसीसीआयने आतापासूनच सुरू केली आहे.

विशेष म्हणजे या वर्षी डिसेंबरच्या आसपास आयपीएल २०२५ साठी मेगा लिलाव होणार आहे. त्यासाठी संघांचे काय मत आहे हे ठरवण्यासाठी बीसीसीआयने सर्व १० संघांच्या मालकांची बैठक बोलावली आहे. यामध्ये काही विशेष निर्णय घेतले जाणार आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार मेगा लिलावापूर्वी रिटेन करता येणाऱ्या खेळाडूंची संख्या वाढवली जाऊ शकते.

डिसेंबरमध्ये होणार मेगा ऑक्शन

आयपीएलमध्ये दर ३ वर्षांनी मेगा लिलाव होतो. आत्ताच्या नियमांनुसार, संघ जास्तीत जास्त ४ खेळाडू रिटेन करू शकतात, बाकीच्या खेळाडूंना रीलीज करावे लागते. यामध्येही संघ केवळ २ परदेशी खेळाडू रिटेन करू शकतात. तसेच, जे खेळाडू रीलीज केले जातात ते लिलावात परत येतात आणि संघांद्वारे विकत घेतले जातात.

दरम्यान, एका वर्तमान पत्राच्या हवाल्याने एक मोठी बातमी समोर आली आहे की पुढील वर्षी होणाऱ्या मेगा लिलावापूर्वी संघांना ४ पेक्षा जास्त खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. रिटेन करता येणाऱ्या खेळाडूंची संख्या ८ पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

अहमदाबादमध्ये संघ मालकांची बैठक होणार 

बीसीसीआय आणि आयपीएल फ्रँचायझी मालकांची बैठक पुढील आठवड्यात अहमदाबादमध्ये होणार आहे. तत्पूर्वी, सूत्रांच्या हवाल्याने असे समोर आले आहे की, बहुतेक संघांनी रिटेन खेळाडूंची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे. 

आयपीएल फ्रँचायझी मालकांना वाटते, की दर तीन वर्षांनी मेगा ऑक्शन होते आणि त्यामुळे बांधणी केलेल्या संघावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे किमान ८ खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी आयपीएलने द्यावी.

तथापि, या सूचनेवर काही आक्षेप आहेत, कारण ज्या संघांना त्यांची कोअर टीम बनवता आलेली नाही, त्यांनाही लिलावादरम्यान मोठे खेळाडू खरेदी करायचे आहेत. प्रत्येक संघाला ८ खेळाडू रिटने करण्याची संधी मिळाली तर जवळपास ८० मोठे खेळाडू रिटेन केले जातील आणि ते लिलावात येणार नाहीत. 

म्हणजेच मोठ्या खेळाडूंना विकत घेण्याची संख्या आपोआप कमी होईल. त्यामुळे बीसीसीआय सर्व फ्रँचायझी मालकांना भेटून यावर काही सोपा मार्ग काढण्याचा प्रयत्न करेल.आयपीएल ऑफिशियल्स आणि संघ मालकांची बैठक १६ एप्रिलला होऊ शकते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या