इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL च्या आगामी हंगामाचा बिगुल वाजला आहे. आयपीएल २०२५ साठी खेळाडूंचा मेगा लिलाव उद्या म्हणजेच रविवारपासून (२४ नोव्हेंबर) सुरू होणार आहे. लिलाव प्रक्रिया दोन दिवस चालणार आहे.
आयपीएल २०२५ चा मेगा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी सौदी अरेबिया येथील जेद्दाह शहरात होणार आहे.
IPL २०२५ च्या मेगा लिलावासाठी एकूण ५७४ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यात ३६६ भारतीय आणि २०८ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. मात्र, लिलावात केवळ १०४ खेळाडूंनाच खरेदी करता येणार आहे. बाकी सर्व अनसोल्ड ठरतील. याआधी सर्व संघांनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.
आयपीएल २०२५ च्या लिलावासाठी १३ देशांतील एकूण ५७४ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यामध्ये स्कॉटलंडचा एक आणि झिम्बाब्वेच्या ३ खेळाडूंचा समावेश आहे. या मेगा लिलावात ८१ खेळाडूंची मूळ किंमत २ कोटी रुपये, तर २७ खेळाडूंची मूळ किंमत १.५० कोटी रुपये आहे. त्याच वेळी, या यादीत १८ खेळाडू असे आहेत, ज्यांची मूळ किंमत १.२५ कोटी रुपये आहे.
आयपीएल २०२५ चा मेगा लिलाव सौदी अरेबियाच्या वेळेनुसार दुपारी १२:३० वाजता सुरू होईल. म्हणजे भारतात तुम्ही दुपारी ३ वाजल्यापासून मेगा लिलाव पाहू शकाल. २४ आणि २५ नोव्हेंबर, म्हणजेच लिलावाच्या दोन्ही दिवसांची वेळ सारखीच आहे.
क्रिकेट चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर IPL 2025 चा मेगा लिलाव पाहू शकतात. तसेच, मोबाइलवर आयपीएल ऑक्शनचे लाईव्ह स्ट्रीमिंग Jio Cinema ॲपवर उपलब्ध असेल. टीव्हीवर पाहणारे दर्शक ते स्टार स्पोर्ट्सवर पाहू शकतात आणि मोबाइलवर पाहणारे दर्शक Jio Cinema ॲपवर लिलाव पाहू शकतात.
आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात अनेक भारतीय सुपरस्टार्सचा समावेश आहे. त्यात केएल राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल असे मोठे भारतीय खेळाडू असतील. याशिवाय अनेक विदेशी दिग्गजही या लिलावाचा भाग असणार आहेत.
परदेशी खेळाडूंमध्ये ग्लेन मॅक्सवेल, फाफ डू प्लेसिस, जोस बटलर, डेव्हिड वॉर्नर, टिम डेव्हिड, मार्को जॅनसेन, जेराल्ड कोएत्झी आणि मिचेल स्टार्क यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.