BCCI announcement on IPL : भारतासह जगभरातील क्रिकेटप्रेमींना प्रतीक्षा असलेल्या आयपीएल २०२५ चं वेळापत्रक भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं अखेर जाहीर केलं आहे. २०२५ च्या आयपीएलचं वेळापत्रक जाहीर करताना बीसीसीआयनं क्रिकेटप्रेमींसह खेळाडूंनाही सुखद धक्का दिला आहे. मंडळानं २०२६ आणि २०२७ च्या मोसमाच्या तारखाही जाहीर केल्या आहेत.
बीसीसीआयच्या घोषणेनुसार, आयपीएल २०२५ च्या मोसमाला १४ मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना २५ मे रोजी खेळला जाईल. २०२६ चा हंगाम १५ मार्च ते ३१ मे दरम्यान खेळवला जाईल, तर २०२७ चा हंगाम १४ मार्च ते ३० मे दरम्यान खेळला जाईल.
ईएसपीएन क्रिकइन्फोनं दिलेल्या माहितीनुसार, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांना आयपीएलच्या पुढील तीन हंगामांच्या तारखांची माहिती ईमेलद्वारे देण्यात आली आहे. हे वेळापत्रक जवळपास अंतिम असून बीसीसीआय लवकरच याची अधिकृत घोषणा करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
यापूर्वी चाहत्यांना हंगाम सुरू होण्याच्या काही दिवस आधीपर्यंत आयपीएलच्या तारखांची वाट पाहावी लागत होती, पण यावेळी बीसीसीआयनं मोठं पाऊल उचलत जवळपास चार महिने आधीच तारखा जाहीर केल्या आहेत. या घोषणेमुळं आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेटचं नियोजन व खेळाडूंनाही आपलं वेळापत्रक आखून घेणं सोपं जाणार आहे.
आयपीएल हंगामाच्या सुरुवातीला किंवा प्लेऑफदरम्यान आंतरराष्ट्रीय मालिकेमुळं इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे बडे खेळाडू उपलब्ध होत नव्हते. आता तारखा जाहीर झाल्यानं या देशांना बोर्डांसाठी आपलं वेळापत्रक सोपं करता येणार आहे.
बीसीसीआयनं यंदाच्या हंगामासाठी जोफ्रा आर्चरच्या उपलब्धतेवर शिक्कामोर्तब केलं आहे. आर्चरनं आयपीएल २०२५ व्यतिरिक्त पुढील दोन हंगामांसाठी आपण उपलब्ध असल्याचं म्हटलं आहे. आयपीएल लिलाव यादी शॉर्टलिस्ट झाल्यानंतर त्याला लिलावात स्थान मिळालं.
बीसीसीआयनं त्याची बेस प्राइस सांगितली नसली तरी आर्चर २ कोटींच्या घरात असेल असं मानलं जात आहे. याशिवाय अमेरिकेचा सौरभ नेत्रावलकर आणि मुंबईचा हार्दिक तामोरे यांचाही लिलाव यादीत समावेश करण्यात आला आहे. आता एकूण ५७४ ऐवजी ५७७ खेळाडू लिलावात सहभागी होणार आहेत.