Sanjiv Goenka On Rohit Sharma: आयपीएल २०२५ सुरू होण्यास अजून बरेच दिवस शिल्लक आहेत. परंतु, आगामी हंगामासाठी सर्व संघांनी आधीच तयारी सुरू केली आहे. नुकतीच लखनौच्या संघाने भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान लखनौच्या संघाचा मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली. यानंतर लखनौ सुपर जायंट्स संघाचे मालक संजीव गोएंका यांचे रोहित शर्माला संघात सामील करून घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, अशी चर्चा आहे. गोएंका यांनी ऑक्शनमध्ये रोहित शर्मावर बोली लावण्यासाठी ५० कोटी ठेवलेत, असेही बोलले जात आहे. अशा चर्चांवर गोएंका यांनी पूर्णविराम लावला आहे.
केएल राहुलच्या नेतृत्त्वात लखनौच्या संघाला काही खास कामगिरी करता आली नाही. यामुळे फ्रँचायझी केएल राहुलला रिलीज करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढून टाकल्यामुळे तो नाराज असल्याचे बोलले जात आहे. स्पर्धेतील एका सामन्यात संजीव गोएंका आणि रोहित शर्मा मैदानात बोलताना दिसले. यानंतर आगामी हंगामात रोहित शर्मा लखनौकडून खेळताना दिसू शकतो, अशी चर्चा सुरू झाली.
स्पोर्ट्स तकला दिलेल्या मुलाखतीत गोएंका यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केले. त्यावेळी रोहित शर्माला संघात सामील करण्यासाठी ५० कोटी खर्च करणार का? या प्रश्नावर उत्तर देताना गोएंका म्हणाले की, 'रोहित शर्मा ऑक्शनमध्ये उपलब्ध असेल की नाही, हे कोणालाच ठाऊक नाही. मुंबईचा संघ रोहित शर्माला रिलीज करेल, हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे. याशिवाय, एका खेळाडूवर ५० कोटी खर्च केल्यास इतर २२ खेळाडू कसे मिळतील?' असा प्रश्न त्यांनी केला.
पुढे रोहित शर्मा आपल्या संघाकडून खेळावा, अशी तुमची इच्छा आहे का? असे विचारल्यानंतर गोएंका म्हणाले की, एक चांगला कर्णधार आणि खेळाडू आपल्या संघात असावा, हे प्रत्येकाची इच्छा असते. परंतु, मला काय हवे आहे, हे महत्त्वाचे नाही. तुमच्याजवळ असलेल्या खेळाडूंकडून तुम्ही कशी कामगिरी करून घेतो, हे महत्त्वाचे आहे. माझी काहीही इच्छा असली तरी प्रत्येक फ्रँचायझीची हीच इच्छा असेल. तुम्हाला सर्वच मिळेल, असे नाही,' असे गोएंका म्हणाले.
मुंबई इंडियन्सच्या संघाचे कौतूक करताना गोएंका म्हणाले की, 'मुंबईचा संघ सामन्यात शेवटपर्यंत पराभव स्वीकारत नाही. त्यांच्या मानसिकतेतून धडा घ्यायला हवा, लखनौच्या संघानेही हीच वृत्ती अवलंबावी. लखनौच्या संघाने आत्मविश्वासाने खेळले पाहिजे. त्यांनी प्लेऑफमध्ये पोहोचण्यापेक्षा जेतेपद जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरले पाहिजे.'