आयपीएल २०२५ पूर्वी मेगा लिलाव होणार आहे. त्याआधी बीसीसीआयने खेळाडूंना रिटेन करण्याचे नियम जारी केले आहेत. प्रत्येक फ्रँचायझी जास्तीत जास्त ६ खेळाडू रिटेन करू शकते. तर आयपीएल संघ ३१ ऑक्टोबरपर्यंत खेळाडूंना रिटेन करू शकतात.
३१ ऑक्टोबरपर्यंत आयपीएलच्या सर्वच संघांना त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे.
आयपीएल फ्रँचायझी त्यांच्या सध्याच्या संघातील एकूण ६ खेळाडूंना कायम ठेवू शकतात. हे एकतर रिटेंशनद्वारे किंवा राईट टू मॅच (आरटीएम) पर्याय वापरून केले जाऊ शकते. या ६ रिटेन्शन/आरटीएममध्ये जास्तीत जास्त ५ कॅप्ड खेळाडू (भारतीय आणि परदेशी) आणि जास्तीत जास्त २ अनकॅप्ड खेळाडू असू शकतात.
दरम्यान, आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलने शनिवारी (२८ सप्टेंबर) हे नियम जाहीर केले. तसेच, जर एखाद्या खेळाडूने ३१ ऑक्टोबरपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले तर त्याला कॅप्ड प्लेयर मानले जाईल. यासोबतच जर रिटेन केलेल्या खेळाडूने लिलावाच्या एक दिवस आधी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले तर, त्याला अनकॅप्ड प्लेयरच मानले जाईल.
रिटेन ६ खेळाडूंमध्ये पहिल्या खेळाडूला रिटेन करण्यासाठी १८ कोटी रुपये द्यावे लागतील. त्यानंतर दुसऱ्या खेळाडूसाठी १४ आणि तिसऱ्या खेळाडूसाठी ११ कोटी रुपये द्यावे लागतील. त्यानंतर चौथ्या खेळाडूसाठी १८ आणि पाचव्या खेळाडूसाठी १४ कोटी रुपये द्यावे लागतील.
आयपीएलच्या सर्वच संघांची ऑक्शन पर्स १२० कोटी रुपयांची असणार आहे. तर त्यांना ६ खेळाडू रिटेन करण्यासाठी ७५ कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. अशा स्थितीत ऑक्शनमध्ये ते ४५ कोटी रुपये घेऊन जाऊ शकतात.