IPL Points Table : आयपीेएल २०२५ मध्ये सोमवारी (३१ मार्च) मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा ८ विकेट्सने पराभव केला. मुंबईच्या वानखेडे स्टेडिमयवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केकेआर संघ ११६ धावांत गारद झाला.
मुंबईचा गोलंदाज अश्विनी कुमार याने आपला आयपीएल पदार्पण सामना खेळताना ४ विकेट घेतल्या, त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने १३व्या षटकात विजयाची नोंद केली. सलामीवीर रायन रिकेल्टनने नाबाद ६२ धावा केल्या.
मुंबई इंडियन्सने हा सामना ८ गडी राखून जिंकला. या मोठ्या विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या नेट रनरेटमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. गुणतालिकेत मुंबई इंडियन्स संघाने मोठी झेप घेतली आहे. तर पराभवानंतर कोलकाता नाईट रायडर्स शेवटच्या स्थानावर घसरला आहे.
आयपीएल २०२५ मधील मुंबई इंडियन्सचा हा पहिलाच विजय आहे, सुरुवातीचे दोन्ही सामने त्यांनी गमावले होते. तर केकेआरने पहिला सामना गमावल्यानंतर दुसरा सामना जिंकला होता. त्यांचा हा तिसऱ्या सामन्यातील दुसरा पराभव ठरला. दोन्ही संघांची स्थिती सारखीच आहे. पण ४३ चेंडूत ८ विकेट्स राखून मोठा विजय नोंदवल्यानंतर मुंबई इंडियन्सचा नेट रनरेट खूपच चांगला झाला आहे.
या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर होते. संघाने केकेआरचा ४३ चेंडूत ८ गडी राखून पराभव केला. स्पर्धेत ५ संघ आहेत, ज्यांनी ३ पैकी १ सामना जिंकला आहे. परंतु या सर्वांमध्ये, मुंबई इंडियन्सचा नेट रन रेट (+०.३०९) सर्वोत्तम आहे. कोलकाताचा पराभव केल्यानंतर संघ दहाव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.
या सामन्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स सहाव्या स्थानावर होते, पराभवानंतर ते तळाला (दहाव्या स्थानावर) घसरले आहेत. त्यांचा नेट रन रेट -१.४२८ सर्व संघांमध्ये सर्वात वाईट आहे.
आयपीएल २०२५ च्या पॉइंट टेबलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पहिल्या स्थानावर आहे. संघाने २ पैकी दोन्ही सामने जिंकले आहेत, त्याचा नेट रनरेट (+२.२६६) देखील सर्वोत्तम आहे. आरसीबी, दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपर जायंट्ससह गुजरात टायटन्स टॉप ४ मध्ये आहेत.
संबंधित बातम्या