आयपीएल २०२५ बाबत सातत्याने धक्कादायक बातम्या येत आहेत. कारण पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी या वर्षाच्या शेवटी खेळाडूंचा मेगा लिलाव आयोजित केला जाणार आहे. अशा स्थितीत सर्व संघातील स्टार खेळाडूंचे संघ बदलू शकतात.
संघ काही खेळाडूंना रिटेन करतील तर बाकीच्या खेळाडूंना संघातून रीलीज करतील. दरम्यान, आता मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
न्यूज २४ च्या रिपोर्टनुसार, भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकून देणारा कर्णधार रोहित शर्मा मुंबई इंडियन्समध्येच राहणार आहे. तो संघ सोडणार नाही किंवा मुंबई इंडियन्स रोहितला रीलीज करणार नाही. फ्रेंचायझी रोहितला रिटेन करण्याच्या विचारात आहे.
याआधी रोहित शर्मा मुंबई इंडियन्सपासून वेगळे होणार असल्याची बातमी आली होती. रोहित शर्मा लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार होणार अशीही बातमी होती. मात्र, या सर्व बातम्या केवळ अफवा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
न्यूज २४ च्या वृत्तानुसार, मुंबई इंडियन्सने स्पष्ट केले आहे की, रोहित शर्मा आयपीएल २०२५ मध्ये संघासोबत राहील. रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडत नसून तो कुटुंबाचा महत्त्वाचा भाग असल्याचे फ्रँचायझीने म्हटले आहे. रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स यांच्यात बोलणी झाल्याचा दावाही करण्यात आला आहे. रोहितही मुंबई इंडियन्ससोबत राहण्यास तयार आहे.
दरम्यान, आयपीएलच्या नियमांनुसार, मेगा लिलावापूर्वी सर्व संघ ४ खेळाडूंना रिटेन करू शकतात. इतर सर्व खेळाडूंना रीलीज करावे लागेल.
मात्र, हा नियम बदलू शकतो, अशीही बातमी आहे. खरे तर रिटेन केलेल्या खेळाडूंची संख्या वाढवावी, अशी मागणी अनेक संघांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की, बीसीसीआय आणि संघांमध्ये ५ खेळाडूंना रिटेन करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, त्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.