आयपीएल २०२५ चा मेगा लिलाव खूपच रंजक होणार आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सर्व संघ त्यांच्या रिटेन आणि रीलीज खेळाडूंची यादी जाहीर करतील.
यावेळी मुंबई इंडियन्सचा संघही अनेक आश्चर्यकारक निर्णय घेऊ शकतो. रोहित शर्मा संघासोबत राहणार की नाही याबाबत अद्याप काहीही सांगता येत नाही. पण याच दरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफची एक मनोरंजक सूचना समोर आली आहे.
आता रोहितने फक्त कर्णधार म्हणून खेळावे, असे कैफचे म्हणणे आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूबाबतही कैफने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आरसीबीने रोहित शर्मासाठी आपला खजिना उघडावा, असे कैफचे मत आहे. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना कैफ म्हणाला की, “रोहित एक महान कर्णधार आहे आणि त्याने आता फक्त आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून खेळले पाहिजे. त्याने टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. त्याच्याकडे अनेक ऑफर्स आहेत. अनेक युवा खेळाडू त्याला फॉलो करतात."
कैफ म्हणाला, “आरसीबीने एक चान्स घ्यावा आणि रोहित शर्माला कसे तरी पटवून द्यावे. त्याला आरसीबीचा कर्णधार बनवायला हवे. त्याला जास्त धावा करता येणार नाहीत, पण त्याला हे चांगले माहीत आहे की एक मजबूत प्लेइंग इलेव्हन कशी तयार करावी.”
वास्तविक, आरसीबीकडे सध्या कायमस्वरूपी कर्णधार नाही. IPL २०२२ च्या आधी विराट कोहलीने कर्णधारपद सोडले. यानंतर फाफ डू प्लेसिसकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. पण डुप्लेसिस आता ४० वर्षांचा झाला आहे.
तर रोहितबद्दल बोलायचे झाले तर तो सध्या ३७ वर्षांचा आहे. पण कर्णधारपदाच्या अनुभवाच्या बाबतीत तो इतर खेळाडूंपेक्षा वरचढ आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले.
गेल्या मोसमापूर्वी मुंबईने रोहितला कर्णधारपदावरून हटवले होते. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईने याआधी रोहितला माहितीही दिली नव्हती. रोहितला काढून टाकल्यानंतर हार्दिक पांड्याकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले. पण आता IPL २०२५ मध्ये खूप मोठा बदल होऊ शकतो.