आयपीएल २०२५ ची प्रचंड उत्सुकता आहे. कारण या आयपीएलपूर्वी खेळाडूंचा मेगा लिलाव होणार आहे. यामुळे अनेक स्टार खेळाडूंचे संघ बदलणार आहेत.
आयपीएल २०२४ पूर्वी झालेल्या मिनी लिलावात मिचेल स्टार्कने आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू होण्याचा विक्रम केला होता. स्टार्कला केकेआरने २४.७५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. पण आता आयपीएलच्या मेगा लिलावात स्टार्कचा हा विक्रम ३ खेळाडू सहज मोडू शकतात. या खेळाडूंना ऑक्शनमध्ये भली मोठी रक्कम मिळू शकते.
आयपीएल २०२४ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळलेल्या फिल सॉल्टने चमकदार कामगिरी केली आणि १२ सामन्यांमध्ये ३९.५५ च्या सरासरीने आणि १८२.०१ च्या स्ट्राइक रेटने ४३५ धावा केल्या.
सॉल्टला रीलीज करण्याबाबत कोलकाताकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. जर KKR ने IPL २०२५ साठी सॉल्टला रिटेन केले नाही तर तो मेगा लिलावात येईल. मेगा ऑक्शनमध्ये त्याच्यावर संघ मालक मोठी बोली लावू शकतात. कारण तो सध्याचा फलंदाजांमध्ये सर्वात चांगल्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतो.
मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या संदर्भात बऱ्याच बातम्या आहेत की मुंबई इंडियन्स फ्रँचायझी त्याला आयपीएल २०२५ साठी रिटेन करणार नाही. मात्र, अद्याप अशी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. जर रोहित शर्माला रीलीज करण्यात आले आणि त्याचे नाव मेगा लिलावात दिसले, तर सर्व फ्रँचायझी त्याच्यासाठी मोठी बोली लावतील. लखनौ सुपर जायंट्स रोहित शर्मासाठी ५० कोटी रुपयांपर्यंत बोली लावू शकते, अशीही बातमी आली आहे.
सॅम करनला आयपीएल २०२३ मध्ये पंजाब किंग्जने १८.५० कोटी रुपयांना विकत घेतले होते. इंग्लिश अष्टपैलू खेळाडूने अनेक वेळा पंजाब किंग्जचे कर्णधारपदही भुषवले आहे. अशा परिस्थितीत पंजाब त्याला सोडणार की कायम ठेवणार याबाबत काहीही सांगता येत नाही. पण होय, जर पंजाबने त्याला रीलीज केले तर सॅम करनला पुन्हा एकदा मोठी रक्कम मिळू शकते.