IPL २०२५ साठी खेळाडूंचा मेगा लिलाव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या लिलावाची उत्सुकता कमालीची वाढत आहे. विशेषतः ऋषभ पंत हा चर्चेचा विषय बनला असून अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याला लिलावात सर्वाधिक किंमत मिळू शकते, असा अंदाज लावला जात आहे.
पंतला दिल्ली कॅपिटल्सने रिटेन केले नाही, त्यामुळे त्याच्यावर मोठी बोली लावण्याची शक्यता वाढत आहे. आता भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याच्या एका वक्तव्याने लिलावापूर्वीच खळबळ उडाली आहे. पंतसाठी २५-३० कोटी रुपयांची बोली लावली जाऊ शकते, असे रैनाने म्हटले आहे.
एका वृत्तपत्राशी बोलताना, सुरेश रैना म्हणाला, की "आपण याकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे. जर तुम्ही ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडे पाहिले तर त्यांना आयपीएलमधून खूप पैसे मिळत आहेत, मग आपल्या खेळाडूंना ते का मिळू नये.
आयपीएल २०२४ मिनी लिलावात केकेआरने मिचेल स्टार्कला २४.७५ कोटी रुपयांची बोली लावून सर्वात महागडा खेळाडू बनवले होते. तर सनरायझर्स हैदराबादने पॅट कमिन्सवर २०.५० कोटींची बोली लावली होती.
सुरेश रैना म्हणाला, की "ऋषभ पंत हा दिल्लीचा कर्णधार, तुफानी फलंदाज आणि एक अव्वल यष्टीरक्षकही आहे. जर तुम्ही त्याची ब्रँड व्हॅल्यू पाहिली तर तो प्रायोजकत्वाच्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरू शकतो. मला वाटते की त्याला २५ ते ३० कोटी रुपये मिळाले पाहिजेत.
सुरेश रैनाने असेही सांगितले की, ऋषभ पंत व्यतिरिक्त, आयपीएल संघ श्रेयस अय्यर आणि केएल राहुलवरही खूप पैसे खर्च करू शकतात.
रैना पुढे म्हणाला, "CSK ला संपूर्ण टीम तयार करायची आहे आणि आता त्यांच्याकडे ५५ कोटी रुपये शिल्लक आहेत. अशा स्थितीत २५-३० कोटी रुपयांचा खेळाडू विकत घेणे त्यांना परवडणारे नाही. त्यांना किमान १८ खेळाडूंचा संघ बनवावा लागणार आहे. पण पंजाबकडे ११०.५० कोटी रुपये शिल्लक आहेत. तसेच, दिल्लीकडे राईट टू मॅचचा पर्याय आहे. तर आरसीबीकडे ८३ कोटी शिल्लक आहे. अशा स्थितीत पंतला आरसीबीने विकत घेतल्यास मला आश्चर्य वाटणार नाही.”