आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावाने केवळ खेळाडूंचा खिसाच गरम केला नाही तर भारत सरकारच्या तिजोरीतही लक्षणीय वाढ केली आहे. आयपीएलच्या आगामी मोसमासाठी खेळाडूंचे ऑक्शन सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात झाला. या लिलावात विकल्या गेलेल्या खेळाडूंच्या मानधनातून मिळणारा टीडीएस भारत सरकारलाच दिला जाणार आहे.
चला तर मग, मेगा लिलावात किती खेळाडूंवर किती पैसे खर्च झाले आणि भारत सरकारला TDS च्या रूपाने किती पैसे मिळणार आहेत, ते जाणून घेऊया.
आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात सर्व १० संघांना जास्तीत जास्त २०४ स्लॉट रिक्त होते. संघांनी एकूण १८२ खेळाडू खरेदी केले. या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी संघांनी एकूण ६३९.१५ कोटी रुपये खर्च केले. या १८२ पैकी १२० भारतीय आणि ६२ परदेशी खेळाडू होते.
भारतीय खेळाडूंवर ३८३.४० कोटी रुपये खर्च करण्यात आले, तर विदेशी खेळाडूंवर २५५.७५ कोटी रुपयांच्या बोली लावण्यात आल्या. भारतीय आणि परदेशी खेळाडूंच्या एकूण रकमेनुसार भारत सरकारला TDS मिळेल. रिपोर्ट्सनुसार, भारतीय आणि परदेशी खेळाडूंच्या पगारावर वेगवेगळा टीडीएस कापला जातो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय खेळाडूंच्या आयपीएल पगारावर १० टक्के टीडीएस आणि विदेशी खेळाडूंच्या आयपीएल पगारावर २० टक्के टीडीएस दिला जाईल. भारतीय खेळाडूंवर ३८३.४० कोटी रुपये खर्च करण्यात आले, त्यानुसार टीडीएस ३८.३४ कोटी रुपये होता.
तर विदेशी खेळाडूंवर २५५.७५ रुपये खर्च झाले, त्यानुसार टीडीएस ५१.१५ कोटी रुपये होता. दोन्ही मिळून ८९.४९ रुपये आहेत, जी टीडीएसच्या रूपात भारत सरकारच्या तिजोरीत जातील.
आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात ऋषभ पंतवर सर्वात मोठी बोली लावण्यात आली होती. त्यानंतर श्रेयस अय्यर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. दोघांच्या आयपीएल पगारात केवळ २५ लाखांचा फरक होता.
पंतला लखनौ सुपर जायंट्सने २७ कोटी रुपयांना विकत घेतले. तर पंजाब किंग्सने श्रेयस अय्यरला २६.७५ कोटी रुपयांना खरेदी केले. यासह पंत आणि अय्यर हे IPL इतिहासातील अनुक्रमे पहिले आणि दुसरे सर्वात महागडे खेळाडू ठरले.