IPL 2025 Mega Auction Day 2 : सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात आयपीएल २०२५नसाठी मेगा लिलाव होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या लिलावाचा पहिला दिवस (२४ नोव्हेंबर) पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या दिवशी म्हणजे आज (२५ नोव्हेंबर) लिलावात अनेक मोठ्या बोली लावल्या जाऊ शकतात. पहिल्याच दिवशी ऋषभ पंतला सर्वाधिक २७ कोटी रुपयांची रक्कम मिळाली.
सॅम कुरन आयपीएल २०२४ पर्यंत पंजाब किंग्जसोबत राहिले. आयपीएल २०२३ मध्ये पंजाबने त्याला १८.५० कोटी रुपयांना खरेदी केले. आयपीएल २०२५ मेगा लिलावात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरनलाही मोठी रक्कम मिळू शकते. जोस बटलर याला काल गुजरात टायटन्सकडून १५ कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळाली. आज त्याचा विक्रम मोडू शकतो.
विल जॅक आयपीएल २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळताना दिसला होता. जॅकने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात चमकदार कामगिरी केली होती. अशा परिस्थितीत, विल जॅक लिलावाच्या दुसऱ्या दिवशी १५ कोटींहून अधिक किंमत मिळवू शकतो, तो जोस बटलरचा विक्रम मोडू शकतो.
वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ११ कोटी रुपयांना विकत घेतले. यावेळीही संघ जोसेफवर मोठा पैसा खर्च करू शकतात. आता कोणता संघ यावेळी जोसेफवर किती पैसा खर्च करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज रोव्हमन पॉवेल त्याच्या जोरदार फटकेबाजीसाठी ओळखला जातो. पॉवेल कोणत्याही संघात फिनिशरची भूमिका बजावू शकतो. अशा परिस्थितीत, संघांना मोठी बोली लावून पॉवेलला संघात घ्यायला आवडेल. गेल्या मोसमात पॉवेल राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसला होता.
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को यान्सेनवर मोठी बोली लावण्यास संघही मागेपुढे पाहणार नाहीत. गोलंदाजीसोबतच यान्सनकडे फलंदाजीतही उत्तम क्षमता आहे. आता यानसेन कोणत्या संघाचा भाग बनतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.