आयपीएल २०२५ साठी मेगा लिलाव यावर्षी डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. एप्रिल ते मे या कालावधीत हा मोसम खेळला जाणार असला तरी त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे.
बीसीसीआय रिटेन्शन नियमाबाबत काय निर्णय घेते हे पाहणे बाकी आहे. दरवर्षी होणाऱ्या लिलावापूर्वी हा प्रश्न नक्कीच पडतो की यावेळी सर्वात महागडा खेळाडू कोण ठरणार? इंडियन प्रीमियर लीगचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी नवनवे विक्रम केले जातात आणि पुढच्याच वर्षी ते मोडले जातात. दरम्यान चाहत्यांना यंदाही हा प्रश्न पडला आहे.
आता रोहित शर्मा या वर्षी लिलावात उतरल्यास तो सर्वात महागडा खेळाडू बनेल का, हा प्रश्न आहे. तसेच, यंदा मिचेल स्टार्कचा विक्रम मोडेल का? हादेखील प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
जर आपण आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूंबद्दल बोललो तर मिचेल स्टार्क हा सध्याचा सर्वात महागडा खेळाडू आहे. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने २४.७५ कोटींना खरेदी केले होते.
त्याच वर्षीच्या आयपीएलमध्ये मिचेल स्टार्कशिवाय त्याचा देशबांधव पॅट कमिन्सवरही मोठी बोली लावण्यात आली होती. पॅट कमिन्सचा सनरायझर्स हैदराबादने २०.५० कोटी रुपयांना आपल्या संघात समावेश केला होता.
दरम्यान, यंदा मुंबई इंडियन्सचा संघ रोहित शर्माला रीलीज करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, या संदर्भात रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. जर तो लिलावात आला तर त्याच्यावर सर्वच संघ मोठी बोली लावू शकतात.
रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला खूप काही दिले आहे. सध्या रोहित शर्माला मुंबई इंडियन्सकडून जवळपास १६ कोटी रुपये मिळतात. पण जर रोहित एमआयपासून वेगळा झाला तर त्याला यापेक्षा जास्त पैसे नक्कीच मिळतील. वास्तविक, रोहित शर्मामध्ये केवळ बॅटनेच नाही तर कर्णधारपदानेही सामने जिंकण्याची क्षमता आहे.
रोहित शर्माने आपल्या कर्णधारपदाने जवळपास हरलेला सामना फिरवल्याचे कितीतरी वेळा घडले आहे. मात्र, तो आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार नाही. रोहित शर्मा कर्णधारपदावरून पायउतार होताच मुंबई इंडियन्सची कामगिरी ढासळली.
रोहित शर्माने मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सोडल्यानंतर संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे.
सूर्यकुमार यादव सध्या टीम इंडियाचा कर्णधार आहे. तो आणखी काही वर्षे संघाचे नेतृत्व करत राहील, असे मानले जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून खेळतो हे फार दुर्मिळ आहे. जेव्हा जेव्हा एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा भारतीय संघाचे कर्णधार होते, तेव्हा ते आपापल्या संघाचे कर्णधारही होते.
अशा स्थितीत सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्सचा संघ सोडला तर तो दुसऱ्या संघात कर्णधार म्हणूनच सामील होऊ शकतो.