आयपीएल २०२५ ची प्रचंड उत्सुकता आहे. कारण या आयपीएलपूर्वी खेळाडूंचा मेगा लिलाव होणार आहे. यामुळे अनेक स्टार खेळाडूंचे संघ बदलणार आहेत. पण आयपीएल २०२४ पूर्वी झालेल्या मिनी लिलावात मिचेल स्टार्कने आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू होण्याचा विक्रम केला होता. स्टार्कला केकेआरने २४.७५ कोटी रुपयांना विकत घेतले होते.
दरम्यान, काही दिवसांत आयपीएलचे सर्व संघ रिटेन आणि रीलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करतील. कोलकाता नाईट रायडर्स संघ त्यांच्या अनेक खेळाडूंना रीलीज करू शकतात.
या यादीत तीन खेळाडूंची नावे समाविष्ट केली जाऊ शकतात. मिचेल स्टार्क, फिलिप सॉल्ट आणि नितीश राणा यांना रीलीज केले जाऊ शकते. गेल्या मोसमात केकेआरने मिचेल स्टार्कला मोठी रक्कम देऊन विकत घेतले होते. पण आता मिचेल स्टार्कला रीलीज केले जाऊ शकते.
केकेआरने स्टार्कला २४.७५ कोटींना विकत घेतले होते. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर स्टार्कची बेस प्राईस २ कोटी रुपये होती. गुजरात टायटन्सनेही स्टार्कला विकत घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. पण गुजरातने २४.५० कोटींनंतर बोली लावली नाही. IPL २०२४ च्या १४ सामन्यात स्टार्कने १७ विकेट घेतल्या. पण तो खूप जास्त महागडा आहे. यामुळे केकेआर त्याला सोडण्याचा निर्णय घेऊ शकते.
केकेआर फिलिप सॉल्टलाही सोडण्याचा विचार करू शकते. सॉल्टला आतापर्यंत आयपीएलमध्ये केवळ २ हंगाम खेळता आले आहेत. त्याने एकूण २१ सामने खेळले आहेत. यामध्ये ६५३ धावा केल्या आहेत. सॉल्टने IPL २०२३ च्या ९ सामन्यात २१८ धावा केल्या होत्या. तर २०२४ मध्ये त्याने ४३५ धावा केल्या. पण केकेआरच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंच्या यादीतून तो बाहेर जाऊ शकतो. त्याला रिटेन करण्यासाठी कोलकाताकडे फार कमी पर्याय असतील. त्यामुळे ते सॉल्टला रीलीज करू शकतात.
केकेआर सध्या नितीश राणा याला पगार म्हणून ८ कोटी रुपये देत आहे. तो २०१८ पासून संघासोबत आहे. राणाला २०२१ पर्यंत ३.४० कोटी रुपये पगार मिळत होता. त्यानंतर २०२२ मध्ये पगार वाढवण्यात आला. संघाने त्याला २०२४ मध्ये कायम ठेवले. पण आता तो बाहेर फेकला जाऊ शकतो. सर्वच संघांसमोर सर्वात मोठी समस्या ही रिटेन करता येणाऱ्या खेळाडूंची संख्या आहे. सध्या केवळ ५ खेळाडूंना रिटेन करता येऊ शकते. त्यामुळे केकेआर इतर खेळाडूंना रिटेन करण्यासाठी नितिश राणाला रीलीज करू शकते.