Michael Vaughan on James Anderson: लवकरच आयपीएल २०२५ साठी मेगा ऑक्शन होणार आहे. यानंतर कोणता संघ मजबूत आहे, हे स्पष्ट होईल. यापूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसन आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा भाग झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही, असे वक्तव्य केले. चेन्नईच्या संघाला स्विंग करण्याची क्षमता असलेला वेगवान गोलंदाज आवडतो, असेही त्यांनी म्हटले आहे. अँडरसनने या वर्षाच्या सुरुवातीला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. या ४२ वर्षीय अनुभवी खेळाडूने पहिल्यांदाच आयपीएल ऑक्शनमध्ये स्वत:चे नाव नोंदवले आहे.
क्लब प्रेयरी फायर पॉडकास्टमध्ये वॉन म्हणाला की, ‘ जेम्स अँडरसन चेन्नई सुपर किंग्जचा भाग झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही. पॉडकास्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक अॅडम गिलख्रिस्ट देखील होता. वॉन म्हणाला, ’चेन्नई सुपर किंग्ज हा असा संघ आहे, ज्याला सुरुवातीच्या षटकात स्विंग करण्याची क्षमता असलेले गोलंदाज आवडतात. त्यांच्या संघात नेहमीच एक गोलंदाज असतो, मग तो शार्दुल ठाकूर असो किंवा अन्य कोणीही. जेम्स अँडरसन चेन्नईच्या संघात दिसला तर आश्चर्य वाटणार नाही.'
अँडरसनने १० वर्षांपूर्वी २०१४ मध्ये शेवटचा टी-२० सामना खेळला होता. कसोटी क्रिकेटला प्राधान्य देण्यासाठी तो कधीही या लीगचा भाग नव्हता. सव्वा कोटी रुपयांच्या बेस प्राइससह तो आयपीएलमेगा ऑक्शनमध्ये सहभागी झाला आहे. अँडरसनला त्याच्या निर्णयाबद्दल विचारले असता त्याने सांगितले की, खेळाविषयीचे आपले ज्ञान वाढविण्यासाठी तो या ऑक्शनमध्ये सहभागी होत आहे.
अँडरसनने गेल्या आठवड्यात 'बीबीसी रेडिओ पॉडकास्ट'वर सांगितले की, 'माझा विश्वास आहे की माझ्यात अजूनही खेळाला काहीतरी देण्याची क्षमता आहे. मी अजूनही खेळू शकतो. मी कधीही आयपीएल खेळलो नाही, मी याचा अनुभव कधीच घेतला नाही आणि अनेक कारणांमुळे मला वाटते की, एक खेळाडू म्हणून माझ्याकडे देण्यासारखे बरेच काही आहे. आयपीएलचे मेगा ऑक्शन येत्या २४ आणि २५ नोव्हेंबरला जेद्दा येथे होणार आहे. या ऑक्शनसाठी १५०० हून अधिक खेळाडूंनी नोंदणी केली आहे.