भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी आयपीएल २०२५ लिलावासाठी ५७४ खेळाडूंची यादी शुक्रवारी (१५ नोव्हेंबर) जाहीर केली. आता या खेळाडूंवर आयपीएल संघ मालकं २४ आणि २५ नोव्हेंबरला जेद्दाहमध्ये बोली लावणार आहेत. मेगालिलावासाठी १५७४ खेळाडूंनी नोंदणी केली असली तरी लिलावासाठी केवळ ५७४ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
या ५७४ खेळाडूंपैकी दोन खेळाडू असे आहेत ज्यांच्यावर सर्वांचे लक्ष असणार आहे. यातील सर्वात युवा खेळाडू १३ वर्षांचा आहे तर सर्वात वयस्कर खेळाडू ४२ वर्षांचा आहे. होय, येथे आपण येथे आयपीएल २०२५ लिलावात सामील होणाऱ्या सर्वात युवा आणि वयस्कर खेळाडूबद्दल बोलत आहोत.
वैभव सूर्यवंशी हा आयपीएल २०२५ लिलावात सहभागी होणारा सर्वात तरुण खेळाडू आहे. वैभव सूर्यवंशी याने नुकतेच बिहारकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
वैभव सूर्यवंशी अवघ्या १३ वर्षांचा आहे. तो डावखुरा फलंदाज आहे आणि आयपीएल मेगा ऑक्शनच्या यादीत ४९१ व्या स्थानावर आहे, अनकॅप्ड बॅट्समन श्रेणीचा (यूबीए ९) भाग आहे आणि खेळाडूंच्या ६८ व्या संचात त्याचे नाव आहे.
सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंडर-१९ युवा कसोटी मालिकेत सूर्यवंशीने शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तो काही कमाल करू शकला नसला तरी त्याच्या नावावर ५ सामन्यांच्या १० डावांमध्ये एकूण १०० धावा आहेत, ज्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या ४१ आहे. वैभव सूर्यवंशी याचे नाव आयपीएल लिलावासाठी शॉर्टलिस्ट होणे म्हणजे काही संघ त्याच्याबद्दल विचार करत आहे.
आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात सहभागी होणारा सर्वात वयोवृद्ध खेळाडू इंग्लंडचा जेम्स अँडरसन आहे. ९९१ आंतरराष्ट्रीय क्रिकेट घेतलेल्या अँडरसनने निवृत्तीनंतर या रंगीत लीगचा अनुभव घेण्याचे ठरविले आहे. अँडरसन वयाच्या ४२ व्या वर्षी आयपीएल लिलावात सहभागी होणार आहे.