सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहारात आयपीएल २०२५ साठी खेळाडूंचा मेगा लिलाव सुरू आहे. हा लिलाव दोन दिवस चालणार असून यामध्ये पहिल्या दिवशी सर्वच संघांनी खेळाडूंवर पैशांची मनसोक्त उधळण केली. आता आज (२५ नोव्हेंबर) दुसऱ्या दिवशीदेखील खेळाडूंवर पैशांचा वर्षाव होऊ शकतो.
पहिल्या दिवशी १० फ्रँचायझींनी मिळून ७२ खेळाडूंना खरेदी केले. यासाठी त्यांनी एकूण ४६७.९५ कोटी रुपये खर्च केले. आता संघांकडे एकूण १७३.५५ कोटी रुपये शिल्लक आहेत. आयपीएल मेगा ऑक्शन २०२५ च्या दुसऱ्या दिवशी १३२ खेळाडू लिलावाच्या मैदानात असतील.
आयपीएल ऑक्शनच्या दुसऱ्या दिवशी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सर्वाधिक रक्कम घेऊन लिलावाच्या टेबलावर बसेल. त्यांच्याकडे ३०.६५ कोटी रुपये शिल्लक आहेत. तर सध्या १६ खेळाडूंचे स्लॉट रिक्त आहेत, ज्यात ५ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
यानंतर मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये २६.१० कोटी रुपये शिल्लक आहेत तर पंजाब किंग्जने दुसऱ्या दिवसाठी २२.५० कोटी रुपये वाचवले आहेत. गुजरात टायटन्सकडे १७.५० कोटी रुपये शिल्लक आहेत तर राजस्थान रॉयल्स लिलावाच्या शेवटच्या दिवशी १७.३५ कोटी रुपयांसह लिलावाच्या टेबलवर बसतील.
चेन्नई सुपर किंग्जच्या पर्समध्ये १५.६० कोटी रुपये शिल्लक आहेत, तर लखनऊ सुपर जायंट्स दुसऱ्या दिवशी १४.८५ कोटी रुपयांसह प्रवेश करेल. दिल्ली कॅपिटल्स १३.८०वकोटी रुपयांसह लिलावात प्रवेश करेल तर कोलकाता नाइट रायडर्स सोमवारी १०.०५ कोटी रुपयांसह लिलावात प्रवेश करेल. सनरायझर्स हैदराबादकडे सर्वात कमी पर्स आहे जी दुसऱ्या दिवशी ५.१५ कोटी रुपये आणेल.
Franchise | Auction spent | Purse remaining | Player slots left |
Mumbai Indians | 18.90 crore | 26.10 crore | 9/25 |
Kolkata Knight Riders | 40.95 crore | 10.05 crore | 12/25 |
Chennai Super Kings | 39.40 crore | 15.60 crore | 12/25 |
Royal Challengers Bengaluru | 52.35 crore | 30.65 crore | 9/25 |
Sunrisers Hyderabad | 39.85 crore | 5.15 crore | 13/25 |
Lucknow Super Giants | 54.15 crore | 14.85 crore | 12/25 |
Rajasthan Royals | 23.65 crore | 17.35 crore | 11/25 |
Punjab Kings | 88 crore | 22.50 crore | 12/25 |
Gujarat Titans | 51.50 crore | 17.50 crore | 14/25 |
Delhi Capitals | 59.20 crore | 13.80 crore | 13/25 |
पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर दुसऱ्या दिवशी सर्वाधिक आरटीएम कार्डसह आयपीएल लिलाव २०२५ मध्ये प्रवेश करतील. दोन्ही संघ समान प्रत्येकी तीन RTM कार्ड घेऊन जातील. पंजाब किंग्सकडे कॅप्ड खेळाडूंचे RTM कार्ड शिल्लक आहे, तर RCB कॅप्ड किंवा अनकॅप्ड खेळाडू जोडू शकते. तर मुंबई इंडियन्सकडे एका अनकॅप्ड खेळाडूचे RTM कार्ड शिल्लक आहे.
CSK, KKR आणि राजस्थानने त्यांची RTM कार्डे वापरली आहेत. हैदराबादकडे एक अनकॅप्ड खेळाडू, गुजरात टायटन्सकडे एक कॅप्ड खेळाडू आणि लखनऊ सुपर जायंट्सकडे एका कॅप्ड खेळाडूचे आरटीएम कार्ड शिल्लक आहे, जे दुसऱ्या दिवशी फ्रँचायझीसह मैदानात उतरतील.
लिलावाच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंनी वर्चस्व गाजवले. यष्टिरक्षक ऋषभ पंतला लखनौ सुपर जायंट्सने २७ कोटींना विकत घेतले. पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. श्रेयस अय्यर हा दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला, ज्याला पंजाब किंग्जने २६.७५ कोटी रुपयांना विकत घेतले, तर व्यंकटेश अय्यरला केकेआरने २३.७५ कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले.
आयपीएलचा दिग्गज डेव्हिड वॉर्नर, इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो, भारताचा देवदत्त पडिक्कल आणि तरुण यश धुल यांना कोणीही खरेदीदार मिळालेला नाही.
तर 'अनकॅप्ड' खेळाडूंपैकी महिपाल लोमरोर (१ कोटी ७० लाख), कुमार कुशाग्रा (६५ लाख), अनुज रावत (३० लाख) आणि निशांत सिंधू (३० लाख) यांना गुजरातने विकत घेतले. कोलकाता नाईट रायडर्सने ज्युनियर स्टार आंगक्रिश रघुवंशीला ३ कोटी रुपयांना खरेदी केले तर मुंबईने फिरकीपटू नमन धीरवर ५ कोटी २५ लाख रुपये खर्च केले.