आयपीएल २०२५ मध्ये अनेक संघांच्या कर्णधार बदलणार आहेत. याचे चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स (KKR) पुढील हंगामात अजिंक्य रहाणे याला कर्णधार बनविण्याच्या विचारात असल्याचे समोर आले आहे.
केकेआरने रहाणेला कर्णधारपदासाठी विकत घेतल्याचे एका वृत्तपत्रात म्हटले आहे. जेद्दाह येथे झालेल्या मेगा लिलावात कोलकाताने रहाणेला १.५ कोटी रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले होते.
या वृत्तात एका सूत्राचा हवाला देऊन म्हटले आहे की, "होय, या क्षणी हे ९० टक्के निश्चित आहे की अजिंक्य रहाणे KKRचा कर्णधार असेल. त्याला विशेषतः कर्णधारपदाचा एक व्यवहार्य पर्याय असण्याच्या उद्देशाने विकत घेण्यात आले होते."
तथापि, याआधी अशाही बातम्या समोर आल्या होत्या, ज्यात असे म्हटले होते की केकेआर पुढील हंगामासाठी अष्टपैलू व्यंकटेश अय्यरकडे संघाची कमान सोपवू शकते. वेंकटेशला फ्रँचायझीने मेगा लिलावात २३.७५ कोटी रुपयांना विकत घेतले.
तथापि, रहाणे किंवा व्यंकटेश अय्यर यांच्यापैकी एक जण कर्णधार होईल, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईची कमान सांभाळणाऱ्या अजिंक्य रहाणेकडे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी संघाची कमान सोपवण्यात आली नाही. मुंबई क्रिकेट असोसिएशनने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी श्रेयस अय्यरला मुंबईचा कर्णधार बनवले.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अय्यर याच्या नेतृत्वाखाली कोलकाताने गेल्या वर्षी (IPL 2024) आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. आता KKR अशा खेळाडूला कर्णधार बनवण्याचा विचार करत आहे, ज्याला मुंबईने T20 टूर्नामेंटसाठी कर्णधार बनवले नाही.
रहाणे मागील दोन हंगामात (२०२३ आणि २०२४) चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता. आता केकेआरने त्याच्यावर विश्वास दाखवला आहे. आता यातून केकेआरला किती फायदा होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
संबंधित बातम्या