IPL 2024 Auction : IPL 2024 साठी उद्याचा दिवस म्हणजेच, रविवार (२६ नोव्हेंबर) खूप खास आहे. या दिवशी, सर्व १० फ्रँचायझी आपल्या रिटेन खेळाडूंची यादी जाहीर करतील. यासह ट्रे़ड विंडो देखील उद्या बंद होणार आहे. अशा स्थितीत पुढील २४ तासांत काही मोठे ट्रेड आणि ट्रान्सफर दिसू शकतात.
दरम्यान, आतापर्यंत फक्त ३ खेळाडूंची आदलाबदल झाली आहे. यातील चौथे नाव गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याचे पुढे येत आहे, पण यावर अधिकृत वक्तव्य येणे बाकी आहे.
२२ नोव्हेंबर रोजी राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात ट्रेड झाला. यामध्ये राजस्थान रॉयल्सने त्यांचा फलंदाज देवदत्त पडिक्कल (७.७५ कोटी रुपये) आणि लखनऊ सुपर जायंट्सने त्यांचा गोलंदाज आवेश खान (१० कोटी) यांची अदलाबदल केली. म्हणजेच आता आवेश खान रॉयल्सच्या जर्सीत तर देवदत्त पडिक्कल लखनौच्या जर्सीत दिसणार आहे.
या आधी ३ नोव्हेंबर रोजी रोमारियो शेफर्ड लखनौमधून मुंबई इंडियन्समध्ये गेला. तो यापूर्वी लखनौ सुपर जायंट्स संघाचा भाग होता.
हार्दिक पंड्या आयपीएल २०२३ पासून मुंबई इंडियन्सच्या संपर्कात होता. २०२३ च्या विश्वचषकापूर्वीही त्याच्या आणि मुंबई फ्रँचायझीमध्ये बोलणी निश्चित झाली होती. आता केवळ अधिकृत औपचारिकता पूर्ण व्हायची आहे.
अशा स्थितीत हार्दिकचे मुंबई इंडियन्समध्ये जाणे जवळपास निश्चित झाले आहे. रोहित शर्माच्या जागी आता हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
तसेच, मुंबईने रोहित शर्माला रीलीज करण्याची योजना आखली आहे का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. रोहितच्या बदल्यात हार्दिकची गुजरातमधून मुंबईत बदली केली जाण्याचीही शक्यता आहे.
उद्या रिटेन खेळाडूंची यादी जाहीर झाल्यानंतर, रीलीज झालेले खेळाडू आणि नव्याने नोंदणी झालेल्या खेळाडूंच्या लिलावाची तयारी सुरू होईल.
यावेळी फ्रँचायझी अनेक महागड्या परदेशी खेळाडूंना रीलीज करू शकतात. यामध्ये बेन स्टोक्स, सॅम करन, जोफ्रा आर्चर, कॅमेरॉन ग्रीन आणि हॅरी ब्रूक या नावांचा समावेश आहे. आयपीएल २०२४ चा लिलाव १९ डिसेंबर रोजी दुबईमध्ये होणार आहे.