आयपीएल २०२४ सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. या मोसमातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि आरसीबी यांच्यात होणार आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघ चेन्नई सुपर किंग्ज गेल्या मोसमात चॅम्पियन बनला होता. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अद्याप एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही.
दरम्यान, आयपीएलमध्ये एकूण १० संघ एकमेकांना भिडतात. हे संघ सामना जिंकले किंवा हरले तरी संघांच्या किंवा खेळाडूंच्या कमाईत फारसा फरक पडत नाही. एका रिपोर्टनुसार प्रत्येकी आयपीएल सीझनमध्ये एक संघ जवळपास ४०० ते ५०० कोटी रुपये कमावतात.
आयपीएलमध्ये खेळाडूही मोठी कमाई करतात. यंदाच्या आयपीएल लिलावात सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्क ठरला. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने २४.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. सोबतच स्टार्क हा आतापर्यंतच्या आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू आहे. केकेआरने आपल्या कमाईचा केवळ काही भाग स्टार्क आणि इतर खेळाडूंवर खर्च केला आहे.
जर आयपीएल संघांच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर ती खूप जास्त आहे. एका बिझनेस मॅगझिनच्या रिपोर्टनुसार आयपीएलचा सेंट्रल पूल ९००० ते १०००० कोटी रुपयांचा आहे. त्याचा ५० टक्के वाटा संघांमध्ये विभागलेला आहे. यानुसार प्रत्येक संघाला सुमारे ४५० ते ५०० कोटी रुपये मिळतात.
आयपीएलमध्ये फ्रँचायझी आणि लीगकडे कमाईचे अनेक स्रोत आहेत. यातील एक मोठा भाग मीडिया प्रसारण अधिकारांचा आहे. आयपीएलने मीडिया राइट्समधून मोठी कमाई केली आहे. हे हक्क ५ वर्षांसाठी विकले गेले आहेत. आयपीएलला प्रायोजकत्वातूनही चांगली कमाई होते. प्रत्येक संघाच्या जर्सीवर प्रायोजकांचे लोगो छापलेले असतात. यासोबतच सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये अनेक ठिकाणी जाहिराती लावण्यात आलेल्या असतात.
खेळाडूंचा खर्च हा संघाच्या उत्पन्नापेक्षा खूपच कमी असतो. लिलावासाठी प्रत्येक संघ १०० कोटी रुपयांची पर्स ठेवतात. यामध्ये ते स्वत:साठी खेळाडू खरेदी करतात. या खर्चाबरोबरच खेळाडूंसाठी हॉटेल, खेळाडूंची किट इत्यादींचाही खर्च होतो. मात्र हा सर्व खर्च फ्रँचायझीच्या प्रत्येक वर्षीच्या उत्पन्नापेक्षा खूप कमी असतो.