Ipl 2024 Start From March 22 : आयपीएलचे चेअरमन अरुण धुमल यांनी आयपीएल २०२४ च्या वेळापत्रकाबाबत मोठी माहिती दिली आहे. आयपीएल २०२४ ही स्पर्धा २२ मार्चपासून सुरू होणार असून संपूर्ण सीझन भारतातच खेळवले जाणार आहे, अशी माहिती धुमल यांनी दिली. तर आयपीएलचा अंतिम सामना २६ मे रोजी रंगणार आहे.
वास्तविक, लोकसभा निवडणुकांमुळे आयपीएल २०२४ भारताबाहेर खेळवण्याची चर्चा सुरू होती. पण आता या चर्चा थांबल्या आहेत. आयपीएल पूर्णपणे भारतातच आयोजित केले जाईल.
लोकसभेच्या निवडणुका एप्रिल-मेमध्ये होणे अपेक्षित आहे, म्हणूनच आयपीएलच्या १७ व्या मोसमाचे पूर्ण वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. धुमल म्हणाले की, सध्या केवळ सुरुवातीच्या १५ दिवसांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल आणि उर्वरित सामन्यांच्या तारखा निवडणूक जाहीर झाल्यानंतर ठरवल्या जातील.
पुढील महिन्याच्या सुरुवातीला लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात. धुमल म्हणाले, ‘आम्ही २२ मार्चपासून स्पर्धेला सुरुवात करत आहोत. आम्ही सरकारी संस्थांसोबत काम करत आहोत आणि आधी सुरुवातीचे वेळापत्रक जाहीर करू.’
दरम्यान, २००९ साली लोकसभा निवडणुकांमुळे आयपीएल दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आले होते. तर त्यानंतर २०१४ साली आयपीएल युएईमध्ये झाले होते. पण २०१९ साली जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या, तेव्हा आयपीएल भारतातच खेळवण्यात आले होते.
आयपीएल २०२४ नंतर लगेच १ जूनपासून टी-20 वर्ल्डकप खेळला जाणार आहे. टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध रंगणार आहे. हा सामना न्यूयॉर्क येथे खेळला जाईल. तर वर्ल्डकपचा पहिला सामना युएसए आणि कॅनडा यांच्यात होणार आहे.