Dinesh Karthik Retires News:अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर काल राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात आयपीएल २०२४ मधील एलिमिनेटर सामना खेळला गेला. या सामन्यात बंगळुरूला चार विकेट्सने पराभव स्वीकारवा लागला. या पराभवासह बंगळुरूचा संघ प्लेऑफमधून बाहेर पडला. हा सामना बंगळुरूचा विकेटकिपर दिनेश कार्तिकसाठी शेवटचा ठरला. त्याने राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर आयपीएलमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थानने बेंगळुरूला चार विकेट्स राखून पराभूत केले. या सामन्यानंतर दिनेश कार्तिकने हातातील ग्लोव्ह्ज काढून निवृत्तीची घोषणा केली. तसेच आपल्या चाहत्यांचे आभार मानले. यानंतर आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने कार्तिकला मिठी मारली आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आयपीएल २०२४ सुरू होण्यापूर्वी त्याने हा हंगाम त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा हंगाम असेल, असे संकेत दिले होते.
ड्रेसिंग रूमकडे परतत असताना कार्तिकला आरसीबीच्या खेळाडूंकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. दिनेश कार्तिकने डेथ ओव्हर्समध्ये आरसीबीसाठी महत्त्वपूर्ण खेळी केली. प्रभावी कामगिरीच्या जोरावर त्याने आरसीबीच्या संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
कार्तिकने २५७ सामन्यांत तब्बल २२ अर्धशतकांसह ४,८४२ धावा करून आपल्या आयपीएल कारकिर्दीचा शेवट केला. आपल्या १७ वर्षांच्या शानदार आयपीएल कारकिर्दीत कार्तिकने या लीगमध्ये सहा फ्रँचायझींसाठी खेळले. त्याने २००८ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्ससंघाकडून सलामीच्या मोसमात पदार्पण केले होते. २०११ मध्ये तो पंजाबमध्ये गेला आणि त्यानंतर तो मुंबई इंडियन्स, गुजरात लायन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि आरसीबीकडून खेळला. त्याने चालू मोसमाचा समारोप १५ सामन्यांत ३६.२२ च्या सरासरीने आणि १८७.३६ च्या स्ट्राईक रेटने ३२६ धावा केल्या.
आयपीएल २०२४ च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर चार विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह राजस्थानने आयपीएल २०२४ च्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. अहमदाबादच्या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने आले, त्यात फाफ डू प्लेसिस आणि कंपनीची कामगिरी निराशाजनक होती. परिणामी, आरसीबीला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.